Wednesday, August 9, 2023

कीड व्यवस्थापनासाठी कृषी विभागामार्फत उपाययोजना

 

कीड व्यवस्थापनासाठी कृषी विभागामार्फत उपाययोजना

अमरावती, दि. 9 (जिमाका): क्रॉपसॅप प्रकल्प सन 2023-24 अंतर्गत खरीप हंगामात राज्यातील प्रमुख पिके सोयाबीन, कापूस, भात, मका, ज्वारी आणि ऊस पिकांचे सर्वेक्षण सुरु आहे. पीकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक आहे.

सोयाबीन पिकांचे वेळोवेळी कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. पीक तणमुक्त ठेवावे. तंबाखूची पाने खाणारी अळी एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात. अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून नष्ट करावीत. भक्षक पक्षांना बसण्यासाठी शेतात 8 ते 10 प्रती एकरी थांबे उभारावेत. 5 टक्के निंबोळी अर्क 50 मिली 10 लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. अळीच्या व्यवस्थापनासाठी एसएलएनपीव्ही 500 एलई विषाणू 2 मि.ली. प्रती लिटर पाणी किंवा नोमुरीया रिलाई या उपयुक्त बुरशीचा 4 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्पोडोप्टेरा या किडीची आर्थिक नुकसान पातळी 10 अळ्या, मीटर ओळ असून पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी अळ्यांच्या सर्वेक्षणासाठी 5 कामगंध सापळे प्रती हेक्टरी लावावेत व निरीक्षणे नोंदवावीत. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.

किडीच्या नियंत्रणासाठी फ्लुबेंडामाईड 39.35 एससी 3 मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 1.90 ईसी प्रती 4 ग्रॅम 8.5 मिली किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18 एससी 5 मिली किंवा स्पायनोटोरम 11.7 एससी 9 मिली किंवा इंडोक्साकार्ब 15.80 ईसी 6.7 मिली किंवा नोवॅल्युरोन 5.25 अधिक इंडोक्साकार्ब 4.50 एससी 16.5 मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रती 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

         कृषी आयुक्तालय स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन

कृषी विभागामार्फत खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, किटकनाशके किवा बियाणे याबाबत तक्रार असल्यास 8446117500, 8446221750, 8446331750 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. तसेच निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून हा कक्ष चोवीस तास सात दिवस कार्यरत राहील. या संदर्भातील तक्रारी शेतकऱ्यांना 9822446655 या व्हॉट्सॲप क्रमांकावर केवळ व्हॉट्सॲप संदेशाव्दारे नोंदविता येईल. याशिवाय शेतकरी आपली तक्रारी controlroom.qc.maharashtra@gmail.com या मेल आयडीवर सुध्दा मेलव्दारे करु शकतात. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी 18002334000 हा कृषी विभागाचा हेल्पलाईन क्रमांक असून शेतकरी बांधवांनी त्याचा वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...