छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 

छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि. 8 (जिमाका) : छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता 9 वी, 10 वी व 11 वी च्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सारथी  शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेचा संबंधित विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन अमरावती उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी (सारथी) यांनी केले आहे.

                इयत्ता 9 वी, 10 वी व 11 वी मध्ये नियमित शिकत असलेल्या व छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तालुकास्तरावर गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडे जमा करावेत. गट शिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर अर्जाची संख्या विचारात घेऊन पुरेशा तज्ज्ञ व्यक्तींमार्फत अर्जाची छाननी व पडताळणी करावी. गट शिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर अर्जाची छाननी व पडताळणी करण्यासाठी माध्यमिक स्तरावरील तज्ज्ञ शिक्षक, अनुभवी मुख्याध्यापक यांची तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. तसेच त्यांना अनुषंगिक सर्व सूचना द्याव्यात. गट शिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर अर्जाची छाननी व पडताळणी केलेल्या व शिष्यवृत्तीस पात्र असलेले सर्व अर्ज दि. 30 ऑगस्ट 2023 पर्यंत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर करावेत.

शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आपल्या जिल्ह्याचे सर्व अर्ज एकत्रित करुन प्रपत्र ख मध्ये जिल्ह्याची माहिती संकलित करावी. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीचे इयत्ता 9 वी, 10 वी व 11 वी चे सर्व अर्ज दि. 6 सप्टेंबर 2023 पर्यंत व्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी, पुणे 411004 या पत्त्यावर खास दुतामार्फत समक्ष अगर स्पीड पोस्टाने सादर करावेत.

 

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्रता

 

तालुकास्तरावर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्जाची छाननी व पडताळणी करताना एनएमएमएस ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या इयत्ता 9 वीमध्ये शिकत असलेल्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी लक्षित गटातील अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती पात्र समजण्यात यावे. इयत्ता 10 वी मध्ये नियमित शिकत असणाऱ्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांनी इयत्ता 9 वी मध्ये 55 टक्के गुणासह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. इयत्ता 11 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी मध्ये 60 टक्के गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासोबत वार्षिक परीक्षेच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.

नॅशनल मेरीट कम मेन्स स्कॉलरशीप (एनएमएमएस) परीक्षा उत्तीर्ण झालेले व केंद्र शासनाच्य मेरीट लिस्टमध्ये येऊन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस घेऊ नयेत. एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या मराठा (खुला संवर्ग ओपन) कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी (ओबीसी संवर्ग) या चार लक्षित गटातील असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी शिष्यवृत्तीस स्वीकारावेत.

                इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांनी http://forms.gle/voaZntddyiBxjCyq8 या लिंक वर ऑनलाईन माहिती अचूक भरावी. इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी http://forms.gle/bXAskh7FqVHAcYqG7 या लिंक वर ऑनलाईन माहिती अचूक भरावी. इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांनी http://forms.gle/hoTrPoEZF7wAUHndA या लिंक वर ऑनलाईन माहिती अचूक भरावी. लिंकवरील माहिती इंग्रजी भाषेत भरणे आवश्यक आहे. 

                विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्था व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. अशा विद्यार्थ्यांचे या शिष्यवृत्तीस अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

                इयत्ता 9 वी मधील प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 3 लक्ष 50 हजार पेक्षा कमी असावे. विद्यार्थ्यांनी तहसीलदाराच्या स्वाक्षरीत असलेला चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा. या उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा. तसेच दाखल्याची प्रत विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत जोडावी. इयत्ता 10 वी व 11 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती साठी 2023 या वर्षातील 1 लक्ष 50 हजार पेक्षा कमी असलेला तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील उत्पन्नाचा दाखला सादर करावा.

                विद्यार्थ्याच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्तीस मागणी केलेला अर्ज इयत्ता 9 वी, 10 वी व 11 वी साठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांचे, प्राचार्यांचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफरास पत्र (प्रपत्र क), विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील सन 2023-24 या वर्षातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत, विद्यार्थ्यांच्या आधार कार्डाची सत्यप्रत, विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या नावाचे बँक खाते असलेल्या पासबुकच्या पहिल्या पानाची सत्यप्रत नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोडसह नमूद असणे आवश्यक आहे, अशी माहिती छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी, पुणे यांच्यामार्फत कळविण्यात आली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती