रक्तदान चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे - मनपा आयुक्त देविदास पवार

 












रक्तदान चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे

-         मनपा आयुक्त देविदास पवार

रक्तदान शिबीर आयोजकांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न

 

          अमरावती, दि. 27 : मानवी शरीरातील रक्त व रक्त घटके ही कोणत्याही कारखान्यात तसेच वनस्पतीपासून निर्माण होत नाही. केवळ मानवी शरीरातून मिळणारे रक्त हेच रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी कामी पडते. यासाठी सातत्याने रक्तदान शिबीरांच्या आयोजनातून रक्त संकलित होणे आवश्यक आहे. रक्तदानाची ही चळवळ अखंडपणे सुरु राहण्यासाठी प्रत्येकाने स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी आज येथे केले.

           जिल्हा सामान्य रुग्णालय, विभागीय रक्तपेढी व रक्तघटक विलगीकरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सामाजिक न्याय भवनात रक्तदान शिबीर आयोजकांचा सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र सोळंके, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील पाटील, रक्तपेढी प्रमुख आशिष वाघमारे, रक्त संकलन अधिकारी डॉ. संदेश हेमलवाड, जनसंपर्क अधिकारी मिलींद तायडे तसेच विविध संस्थेचे शिबिर आयोजक आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले की, रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असून प्रत्येकाने रक्तदान करणे आवश्यक आहे. मनुष्याचे जीवन वाचविण्यासाठी रक्त हा घटक अत्यंत आवश्यक असते. रक्त संकलन करण्यासाठी समाजातील अनेक रक्तवीर व विविध स्वयंसेवी संस्था शिबीरांचे आयोजन करीत असतात. त्यांनी केलेल्या रक्तसंकलनातून अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते. अश्या या जीवनदान देणाऱ्या रक्तवीरांचा सत्कार व गौरव जागतिक रक्तदिना निमित्त करण्यात आला. समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या रक्तवीरांच्या सत्काराने त्यांचे हे विधायक काम अविरत सुरु ठेवण्यास प्रोत्साहन मिळते.  अतितातडीच्या प्रसंगी गरजूंना रक्त पुरवठा उपलब्ध करुन देण्यात महत्वपूर्ण काम विभागीय रक्तपेढीच्या माध्यमातून होते. हे काम अविरतपणे सुरु राहण्यासाठी शिबीरांच्या आयोजनातून अधिक प्रमाणात रक्त संकलन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

            याप्रसंगी श्री. पवार यांनी त्यांच्या मुलाच्या आजारपणातील प्रसंग विशद करुन रक्ताचे व रक्तदानाचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले. रक्तदात्या मुळेच त्यांच्या मुलाचे प्राण वाचू शकले. तेव्हापासून त्यांनी रक्तदानाचे महत्व इतरांना पटवून देऊन नियमित रक्तदान केल्याचे सांगितले. जीवनावश्यक घटकापैकी रक्त हे एक महत्वाचा घटक असून प्रत्येकाने नियमितपणे रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

दीडशे रक्तदान शिबिर आयोजकांचा सत्कार

यावेळी 150 रक्तदान शिबिर आयोजकांचा प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. राजकुमार दासरवाड, सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, प्रा. आशिष भोपळे, प्रा. आशिष सायवान, वंदे मातरम फाउंडेशनचे श्री. दापुरकर व त्यांची चमू, बळवंत वानखडे, दयाराम जावरकर, अमरावती रक्तदान समितीचे प्रा. संजय कुलकर्णी, राकेश ठाकूर, श्याम शर्मा, मोहन लढ्ढा, उमेश पाटणकर, अरण्य फाउंडेशनचे श्रेयस पन्नासे आदींचा प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्तपेढी ही जिल्ह्यासह विभागातही रक्त पुरवठा करते. पश्चिम विदर्भातील ही एकमेव शासकीय रक्तपेढी असून 1990 पासून कार्यरत आहे. विभागातील सिकलसेल, थ्यालेसीमिया, हिमोफिलीया या आजारग्रस्तांना तसेच गरजूंना आवश्यकतेनुसार रक्तपेढीव्दारे रक्त पुरवठा केल्या जातो. या रक्तपेढीत शिबीरांच्या आयोजनातून वर्षाला सोळा हजार रक्त पिशव्या रक्त संकलित केल्या जाते, अशी माहिती डॉ. संदेश हेमलवाड यांनी प्रास्ताविकातून दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलींद तायडे यांनी केले तर योगेश पानझाडे यांनी आभार मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती