अंमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंधासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक; समितीच्या बैठकीत चर्चा




अंमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंधासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक;

समितीच्या बैठकीत चर्चा

 

               अमरावती, दि. 17 : अंमली पदार्थ वापराच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे. या सामाजिक प्रश्नाला आळा घालण्यासाठी  सर्व विभागांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस उपआयुक्त सागर पाटील यांनी केले.

 

            अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून जिल्हास्तरीय अंमली  पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांची पोलिस आयुक्तालयात आज बैठक झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासनचे औषध निरीक्षक स्वाती भरणे, टपाल विभागाचे जनसंपर्क अधिकार निरीक्षक नरेंद्र गिरपुंजे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अरविंद गभणे, पोलीस निरीक्षक राहुल आठवले, कृषी उपसंचालक विभागाचे उज्ज्वल आगरकर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ज्योत्स्ना खांडोकार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

             अंमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम,  टपालाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही तसेच जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता घेणे, व्यसनमुक्ती केंद्रांशी समन्वय राखणे, दाखल झालेल्या व्यक्तींना कोणत्या अंमली पदार्थांचे व्यसन आहे याबाबतची माहिती, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती अभियान राबवणे,  पोलीस, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो  व राज्य उत्पादन शुल्क यांनी केलेल्या कारवायांच्या माहितीचा डेटाबेस तयार करणे, अंमली पदार्थांविरुध्द गुन्हे व करावयाची कार्यवाहीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

 

         औषध विक्रेत्यांकडून अनेकदा प्रिस्किप्शनशिवाय औषधे दिली जातात. बंदी घातलेल्या औषधांतील काही ठराविक घटक असलेली वेगळी औषधेही निरनिराळ्या नावाखाली उपलब्ध असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होता कामा नये. याबाबत मेडिकल स्टोअर्सची नियमित तपासणी करावी. टपाल विभागाने पार्सल प्राप्त करणाऱ्याची चौकशी करुन व त्या पार्सलमध्ये काय आहे याची तपासणी करुनच संबंधित व्यक्तीला पार्सल सुपूर्द करावे. बंद पडलेल्या कारखान्यांत अनेकदा रात्रीच्या वेळी अवैध उत्पादन निर्मितीचे प्रकार पूर्वी घडले आहेत. तसे घडू नये, यासाठी वेळोवेळी तपासण्या करण्याचे निर्देश श्री .पाटील यांनी  यावेळी दिले.

 

             अंमली पदार्थांची विक्री जास्त होणाऱ्या परिसरात अन्न व औषध विभागाने वेळोवेळी तपासणी करावी. विविध विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. याबाबत अधिकाधिक जनजागृती करावी. व्यसनमुक्ती केंद्राशी समन्वय ठेवावा, आदी सूचना श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती