‘मेरी मिट्टी, मेरा देश’ उपक्रमाला आजपासून प्रारंभ जावरा येथे अमृत रोपवाटिकेत 75 आंबा रोपांची लागवड

 













‘मेरी मिट्टी, मेरा देश’ उपक्रमाला आजपासून प्रारंभ

जावरा येथे अमृत रोपवाटिकेत

75 आंबा रोपांची लागवड

 

अमरावती, दि. 9 (जिमाका): केंद्र शासनाच्या ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या उपक्रमाला आजपासून प्रारंभ झाला आहे. हा उपक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज जिल्ह्यात महानगरपालिकेसह नगरपालिका आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा उपक्रम विविध माध्यमातून राबविण्यात आला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आणि मातृभूमीच्या अभिमानासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा थोर विभूतींचे स्मरण म्हणून स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करणाऱ्या शिलाफलकाची येथे स्थापना करण्यात आली. तसेच स्वातंत्र्य संग्राम सेनानी गोपाळराव नारायणराव डोरलीकर यांच्या कुटुंबियांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांसमवेत पंचप्रण शपथ घेण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा सांगता समारोप म्हणून ‘माझी माती, माझ देश’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील 841 ग्रामपंचायतीमध्ये आजपासून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरोंका वंदन यासारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक उभारण्यात येत आहेत.

जावरा ग्रामपंचायतीने ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ वसुधा वंदन उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत येथे 75 महिलांनी 75 देशी आंबा रोपांची लागवड करुन अमृतवाटिका तयार केली. 75 मिनिटात रोपे लागवड करून स्वातंत्र्यवीरांना यावेळी मानवंदना देण्यात आली. तसेच ग्रामपंचायतमार्फत शुध्द पाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘वॉटर एटीएम मशीन’चे उद्घाटन करण्यात आले. वॉटर एटीएम मशीनमध्ये पाच रुपयांचा कॉईन टाकल्यास पंधरा लीटर शुध्द पाणी गावकऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे. तसेच शबरी आवास योजनेंतर्गत घरकुल प्राप्त झालेले गजानन मरसकोल्हे या लाभार्थ्याच्या घरकुलाची मान्यवरांनी पाहणी केली. त्यानंतर सार्वजनिक शौचालयाचेही यावेळी लोकार्पण करण्यात आले.

सरपंच प्रतिभा मोहोळ, उपसरपंच प्रशांत ठाकरे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट, स्वप्निल मालखेडे, विस्तार अधिकारी पंचायत संदीप देशमुख, विठ्ठल जाधव, पोलीस पाटील विवेक खंडार, तंटामुक्त समिती अध्यक्ष मंगेश ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, बचत गटाच्या महिला यावेळी उपस्थित होत्या.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती