Wednesday, August 9, 2023

वारसनोंदीची सुविधा ऑनलाईन उपलब्ध

 

वारसनोंदीची सुविधा ऑनलाईन उपलब्ध

अमरावती, दि. 9 (जिमाका): शेत जमिनीसाठी वारसनोंद, हक्कसोड लेख, वाटणीपत्र, अनोंदणीकृत फेरफार नोंद करायाची असल्यास तलाठी कार्यालयात जाण्याची आता गरज भासणार नाही. नागरिकांना घरबसल्या या नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. महसूल विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 1 ऑगस्टपासून राज्यात वारसनोंदीसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पुढील टप्प्यात बोजा दाखल करणे, अथवा कमी करणे व अन्य सुविधा ई-हक्क प्रणालीव्दारे उपलब्ध करुन देणार असल्याचे दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी कळविले आहे.

महसूल विभागाने यापूर्वी डिजिटल सातबारा उतारा, ई-फेरफार, ई-चावडी, ई-पीक पाहणी अशा प्रमुख सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. कोरोना काळानंतर ऑनलाईन सुविधांचा वापरही नागरिकांकडून वाढला आहे. यासाठी वारसनोंदीची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यापूर्वी वारसनोंदीसाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागत होता. नागरिकांचा हा त्रास आता वाचणार आहे.

ऑनलाईन प्रक्रियेसाठी ई महाभूमी अथवा http://pdeigr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज संबंधित गावाच्या तलाठ्याकडे जाईल. तलाठी ऑनलाईन पडताळणी करतील. कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्याची माहिती अर्जदाराला मेलव्दारे मिळणार. कागदपत्रे पूर्ण असल्यास त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यात येईल.

00000

 

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...