Friday, January 19, 2018

महाराष्ट्रातील 15 महिलांना
राष्ट्रपतींच्या हस्ते आज "फर्स्ट लेडी" पुरस्कार

नवी दिल्ली, 19 : विविध क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या महाराष्ट्रातील 15 महिलांसह देशातील 112 कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या शनिवार दि.20 जानेवारी रोजी  "फर्स्ट लेडी" पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
            केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 112 महिलांची निवड "फर्स्ट लेडी" पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील 15 कर्तृत्ववान महिला "फर्स्ट लेडी" पुरस्काराच्या मानकरी  ठरल्या आहेत. देशातील पहिल्या महिला  प्रवासी रेल्वे चालक सातारा येथील सुरेखा यादव, जागतिक ग्रँड मास्टर किताब मिळविणा-या पहिल्या महिला भारतीय बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे, देशातील पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी हर्षींनी कण्हेकर( नागपूर) , देशातील पहिल्या महिला ऑटोरिक्षा चालक परभणी जिल्ह्यातील शिला डावरे,सॅनिटरी नॅपकीनची पहिली डिजीटल बँक सुरु करणा-या देशातील पहिल्या आमदार वर्सोवा, मुंबई येथील विद्यमान आमदार डॉ.भारती लव्हेकर, भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ पुण्याच्या अरुणा राजे पाटील, भारतीय महिला  क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या  कर्णधार डायना एडलजी, देशातील पहिली कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करणाऱ्या मुंबई येथील स्नेहा कामत, देशातील  पहिल्या महिला नोंदणीकृत गुप्तहेर पालघर येथील रजनी पंडित, ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया’ (असोचेम) च्या पहिल्या महिला अध्यक्ष मुंबई येथील स्वाती परिमल, ‘व्हाईट प्रिंटहे अंधांसाठी देशातील पहिले लाईफ स्टाइल मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित करणाऱ्या पहिल्या महिला मुंबई येथील उपासना मकाती, देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची प्रसुती करणाऱ्या मुंबईच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.इंदिरा हिंदुजा, डिजिटल आर्ट द्वारे भारतातील महिला योध्यांचा परिचय करून देणारी पहिली महिला कलाकार अठरा वर्षीय तारा आनंद यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या महिला नायिका महाराष्ट्र कन्या दुर्गाबाई कामत व देशातील पहिल्या महिला तबला वादक डॉ.अबन मिस्त्री यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.                        
भारतरत्न मदर तेरेसा, कल्पना चावला, बचेंद्रि पाल, ऐश्वर्या रॉय बच्चन, पी.व्ही सिंधु, सानिया मिर्जा, गीता फोगट, सायना नेहवाल,साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मिताली राज आदी कर्तृत्ववान महिलांचाही "फर्स्ट लेडी" पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...