Tuesday, January 23, 2018

दावोस येथील परिषदेत ब्रिटीश कंपनीशी सकारात्मक चर्चा
राज्यात संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीसाठी
बीएई’ गुंतवणूक करणार- मुख्यमंत्री

मुंबईदि. 24संरक्षणविषयक उत्पादनांची महाराष्ट्रात निर्मिती करण्यास बीएई सिस्टीम्स ही ब्रिटीश कंपनी उत्सुक असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार आहे. बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष रॉजर कार यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली.
                     दावोस येथील वर्ल्‍ड इकॉनॉमिक फोरमच्या 48 व्या वार्षिक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे शिष्टमंडळ जागतिक पातळीवरील विविध प्रतिष्ठित आर्थिक-औद्योगिक संस्थांशी संवाद साधत आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष श्री. कार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. बीएई सिस्टीम्स ही संरक्षणसुरक्षा आणि एरोस्पेस क्षेत्रातील बहुराष्ट्रीय ब्रिटीश कंपनी आहे. या कंपनीने महाराष्ट्रात संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखविली आहे. त्यासाठी राज्य सरकार त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देणार आहे. पुढच्या महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या जागतिक उद्योग परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रणसुद्धा कंपनीने स्वीकारले असून भारतीय कंपन्यांसोबत संरक्षण उत्पादन क्षेत्रात अधिक काम करण्याची तयारी देखील त्यांनी दर्शविली आहे.  
                     जागतिक बॅंकेच्या फूड अँड ॲग्रिकल्चर ग्लोबल प्रॅक्टिस विभागाचे वरिष्ठ संचालक जॉर्जेन व्योगेल यांनीही दावोस येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जागतिक बँकेच्या मदतीने राज्य सरकार राबविणार असलेल्या हवामानपूरक शेतीचा प्रकल्प अर्थात नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेबाबत अतिशय चांगली चर्चा झाली. या प्रकल्पासाठीच्या बहुतेक बाबींची पूर्तता केंद्र सरकारकडे करण्यात आली असल्याने जागतिक बँक लवकरच त्यावर निर्णय घेणार आहे, अशी माहिती श्री. व्योगेल यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
                     दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी या परिषदेतील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट देऊन राज्यातील गुंतवणुकींच्या संधींबाबत चर्चा केली. तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
-----000-----

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...