मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसितांना सर्वतोपरी सहकार्य
-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
                 मुख्यमंत्र्यांशी आज बैठकीत चर्चा
अमरावती, दि. 9 :  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रातून पुनर्वसित करण्यात आलेल्या आदिवासी बांधवांना शासनाकडून पुनर्वसनासाठी वेळोवेळी साह्य करण्यात आले आहे. यापुढेही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. पुनर्वसितांच्या मागण्यांबाबत मी स्वत: आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे सांगितले.
          व्याघ्र प्रकल्पातील सोमठाणा बु., सोमठाणा खु., धारगड, अमोना, केळपाणी, गुल्लरघाट, नागरतास, कारूखेडा आदी गावांतील आदिवासी बांधवांचे अकोट व तेल्हारा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे, असे सांगून श्री. पोटे- पाटील म्हणाले की, ही सर्व गावे वनविभागाच्या अखत्यारीत येतात. अशा क्षेत्रात पुनर्वसनासाठी साह्याची तरतूद नव्हती. तथापि, 2008 ते 2012 या कालावधीत पुनर्वसित कुटुंबातील 18 वर्षांवरील सदस्याला 10 लाख रुपयांचे साह्य करण्यात आले. 2012 नंतर वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या सदस्यांना 10 लाख रुपये साह्य देण्याचा निर्णयही घेण्यात आला व त्यानुसार ती मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. पुनर्वसनस्थळी विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, पुनर्वसितांच्या मागण्या लक्षात घेऊन वनविभागाच्या नियमांमध्ये सुधारणा करुन यापूर्वीच शासन निर्णय काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्वसित कुटुंबांच्या मागण्यांबाबत दि. 18 सप्टेंबर 2017 रोजी विशेष बैठक घेतली. त्यानुसार तेल्हारा व अकोट येथील पुनर्वसनस्थळी सुविधांसाठी साडेपाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या निधीतून 90 टक्के विकासकामे पूर्ण झाली आहेत. अकोला जिल्हा प्रशासनाकडून ही कामे होत आहेत. मी स्वत: तेल्हारा व अकोट येथे जाऊन चर्चा केली आहे. 700 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. शासन आदिवासी कल्याणासाठी सतत प्रयत्नशील आहे.
मुख्यमंत्र्यांशी आज केली पुन्हा चर्चा : श्री. पोटे- पाटील
पुनर्वसितांनी काही मागण्यांसाठी व्याघ्र प्रकल्पात धरणे धरले आहे. आज मंत्रालयात पर्यटन स्थळांच्या विकासाबाबतच्या बैठकीत याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह सर्व प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पुनर्वसित बांधवांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले. 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती