मराठी पत्रकारदिनानिमित्त श्रीशिवाजी महाविद्यालयात कार्यक्रम
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी अचूक अभिव्यक्तीचे तंत्र आत्मसात करावे
-         डॉ. अविनाश सावजी
          अमरावती, दि. 6 :  अचूक अभिव्यक्ती ही पत्रकारितेसह सर्वच क्षेत्रांत आवश्यक आहे. पत्रकारिता ही लोकसंवाद साधणारी असल्यामुळे अचूक शब्दांची निवड व मांडणी यातून अभिव्यक्ती साधण्याचे तंत्र पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, असे प्रयास या संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी आज येथे सांगितले.
श्रीशिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, ‘आयआयएमसी’चे अमरावती केंद्र व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे दर्पणदिन व मराठी पत्रकारदिन कार्यक्रम महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सावजी बोलत होते. महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाच्या संवादक या अनियतकालिकाचे प्रकाशनही यावेळी झाले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. श्रीशिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, भारतीय जनसंचार संस्थेचे (आयआयएमसी) संचालक प्रा. नदीम खान, महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. कुमार बोबडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते.
डॉ. सावजी म्हणाले की, येणारा काळ हा संवादयुग असणार आहे. त्यामुळे पुढील काळात शब्दांची शक्ती महत्वाची ठरणार आहे. संवाद माणसाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे अचूक निरीक्षणशक्ती व प्रभावी शब्दांचा वापर करणे आत्मसात करणे आवश्यक आहे.   
श्री. अग्रवाल म्हणाले की, माध्यमांच्या क्षेत्रात व्यावसायिकता आल्याची अनाठायी टीका केली जाते. कुठल्याही क्षेत्रात व्यावसायिकता ही अपरिहार्य आहे. त्यामुळे माध्यमांच्या क्षेत्रात निकोप स्पर्धा व व्यावसायिकता असणे गैर नाही.  या क्षेत्रात रोज नवनवी आव्हाने उभी राहत असतात. त्यांना यशस्वीपणे तोंड देत हे क्षेत्र विस्तारत आहे.
श्री. खाडे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारिता हे मिशन म्हणून कार्यरत आहे. देशाच्या विकास प्रक्रियेत पत्रकारितेने मोठे योगदान दिले आहे. श्रीमती डॉ. देशमुख म्हणाल्या की,  माहिती- तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे माहितीचे प्रचंड भांडार विद्यार्थ्यांपुढे खुले झाले आहे. त्यातून अचूक माहितीची निवड करण्याची जबाबदारी अभ्यासक व विद्यार्थ्यांवर येते. त्यासाठी अभ्यासाला सकारात्मक दृष्टिकोन व विवेकाची  जोड असणे आवश्यक आहे.
प्रशांत राठोड यांनी ‘संवादक’च्या प्रकाशनाबाबत भूमिका विशद केली. प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या व भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. डॉ. बोबडे यांनी प्रास्ताविक केले. आकांक्षा काकडे व नेहा फटिंग यांनी सूत्रसंचालन केले. श्री. पवार यांनी आभार मानले.   








Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती