Thursday, January 11, 2018

शासकीय विदर्भ महाविद्यालयात हरित पर्यावरण प्रदर्शन
‘स्टार्टअप’ व ‘कौशल्य विकास कार्यक्रमा’तून नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना

-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 10 : नैसर्गिक रंग, पारंपरिक कशिदाकारी यातून कापड व इतर उत्पादनांचा दर्जा वाढविण्याची संकल्पना नाविन्यपूर्ण आहे. अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देत रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न ‘कौशल्य विकास कार्यक्रम’ व ‘स्टार्टअप इंडिया’च्या माध्यमातून शासनाकडून होत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या नागरिकांनीही योगदान देत विकासाच्या या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.   
शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या गृहविज्ञान शाखेतर्फे ग्रीन टेक्स्टाइल्स, ग्रीन फॅशन्स व हरित पर्यावरण स्पर्धा व प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. गृह तथा कौशल्य विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, संस्थेच्या संचालक अर्चना नेरकर, गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. अंजली देशमुख, प्रा. अजय चौधरी, डॉ. जयंत वडतकर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
श्री. पोटे- पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने ‘स्टार्टअप’द्वारे नवे उद्योग व कौशल्यविकासातून कुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना दिली आहे. अमरावती येथील वस्त्रोद्योग पार्कमध्ये 32 नव्या उद्योगांमुळे मोठी रोजगारनिर्मिती होणार आहे. समाजातील विविध संस्था, संशोधक, नागरिक यांच्या नव्या संकल्पना व योगदान या विकास प्रक्रियेला गती देणारे ठरेल. 
अनेक संस्था व नागरिकांच्या सहकार्यातून अमरावतीत अनेक नव्या उपक्रमांना चालना मिळू शकली. सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून 28 हजार महिलांना प्रशिक्षण मिळाले. अनेकांना स्वयंरोजगार मिळाला. इर्विन- डफरीन रुग्णालयांत येणा-या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळ भोजन पुरविण्याचा ग्रामरोटी हा उपक्रम लोकसहभागाचे उत्कृष्ट उदाहरण आहे, असेही श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले.
गृहराज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांतून साकारलेल्या कलाकृती आधुनिकता व परंपरा यांच्या मेळ साधणा-या आहेत. नैसर्गिकरीत्या मिळवलेल्या रंगांचा वापर जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांतून केला आहे. अशा संकल्पना व प्रयोगांतून नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासन निश्चितच सहकार्य करेल.
नैसर्गिक स्त्रोतांतून रंगनिर्मितीची पद्धती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे व वस्त्रकला संग्रहालय उभारणे यासाठी महाविद्यालयातर्फे प्रयत्न होत असल्याचे   श्रीमती नेरकर व श्रीमती देशमुख यांनी सांगितले. 
यावेळी प्रदर्शनात उत्कृष्ट कलाकृती व संकल्पना सादर करणा-या अभिजित देशमुख, शीतल देशमुख, शारदा डोंगरे, रजनी शिर्के, संध्या मेश्राम, धनश्री सांगोले, अंजू पथाडे, प्रतीक खंडारे, प्रियंका दुबे, सुनीता देशमुख, अश्विनी बडेरे, अजय गेडाम, यश दुबे, रोहित खोरगडे, किशोर कु-हे, प्रतीक वाघ, रक्षंदा बेलसरे यांना यावेळी गौरविण्यात आले.  
00000








No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...