Friday, January 19, 2018

भातकुली ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण
ग्रामीण महाराष्ट्रात उत्तम व अद्ययावत आरोग्य सुविधा
-         सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत
अमरावती, दि. 19 : मेळघाटासह सर्व ग्रामीण महाराष्ट्रात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भातकुली ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पण समारंभात सांगितले. या ग्रामीण रुग्णालयासाठी विशेष बाब म्हणून 2 खाटांच्या ‘आयसीयु’ची घोषणा करतानाच, हे काम 2 महिन्यात पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाहीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
          पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, माजी आमदार संजय बंड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.   
          डॉ. सावंत म्हणाले की, राज्यात सर्वदूर उत्तम आरोग्य सेवेसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. महात्मा फुले जनआरोग्य अभियानासारखी  सुमारे 2 कोटी 43 लाख कुटुंबांना लाभ मिळू शकेल अशी योजना सुरु करण्यात आली आहे.  मेळघाटात विविध यंत्रणांच्या समन्वयातून उत्तम आरोग्य सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे बालमृत्यूच्या दरात घट झाली असून, सर्वत्र आरोग्य सेवांचा दर्जाही वाढला आहे. ‘इंडिया टुडे’च्या देशभरातील विविध राज्यांतून पुरस्कारासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची निवड करण्यात आली आहे.  ग्रामीण महाराष्ट्रात यापुढेही आरोग्य सेवेचे जाळे अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करु, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात टेलिमेडिसिन प्रकल्प, महाआरोग्य शिबिरे आदी अनेक नव्या उपक्रमांना चालना मिळाली. मेळघाट व राज्यातील सर्व आदिवासी क्षेत्रात त्यांनी स्वत: अनेक दौरे करुन तेथील प्रश्नांचा अभ्यास केला व लोकहिताच्या योजनांची अंमलबजावणी केली. भक्कम आरोग्ययंत्रणेसाठी राज्य शासनाकडून अनेक योजना अंमलात आणण्यात आल्या आहेत.
खासदार श्री. अडसूळ, श्री. बंड यांनीही मनोगत व्यक्त केले. या रुग्णालयासाठी 1967 मध्ये 5001 रुपयांची देणगी देणा-या मैनाबाई राठी यांचा सर्व मान्यवरांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला व त्यांचा नामफलक रुग्णालयात लावण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
00000






No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...