राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
सुदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा

-  विभागीय आयुक्त पीयुष सिंह
अमरावती, दि. 25 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रिया मूलभूत असल्यामुळे मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. त्यासाठी मतदारदिनासारखे उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे सांगितले.   
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त (Natioanl Vottrs Day) मतदारामध्ये जागृती घडवून आणण्यासाठी जिल्ह्यातील एकूण 2543 मतदान केंद्रावर राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. याचअंतर्गत जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मुख्य कार्यक्रम येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात झाला. त्यावेळी श्री. सिंह बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख आदी उपस्थित होते.  
 लोकशाहीच्या भवितव्यासाठी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे यासाठी मतदारदिनाचे आयोजन केले आहे. निवडणूक व्यवस्थापन, मतदार शिक्षण, नैतिक सहभाग, मतदान व मतदान मोजणी आदींबाबत जागरूकतेसाठी शाळा- महाविद्यालयांत मतदार साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. बांगर यांनी दिली.
रॅली व मतदारदिनाची शपथ
 मतदारदिनानिमित्त आज सकाळी शहरात रॅली काढण्यात आली. त्यात अनेक शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व नवमतदार त्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सर्वांना मतदारदिनाची शपथ देण्यात आली.  1 जानेवारी  2000 रोजी जन्मलेल्या सहस्त्रक मतदारांचा व दिव्यांग मतदारांचा, मतदान साक्षरता क्लबची स्थापना करणा-या शाळा- महाविद्यालयांच्या प्रतिनिधींचा आणि मतदार नोंदणीसाठी उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी-कर्मचा-यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांच्या संदेशाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. सभागृहाच्या आवारात स्वाक्षरी संदेशफलक ठेवण्यात आला होता. त्यावर विविध मान्यवरांसह नागरिक, नवमतदारांनी स्वाक्षरी केली.
उपायुक्त (पुरवठा) रमेश मावसकर, उपायुक्त (महसूल) गजेंद्र बावणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डी. आर. काळे, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, श्री. येडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. प्रकल्प संचालक (बालविकास) प्रवीण येवतीकर यांनी सूत्रसंचालन केले.
00000               











Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती