शहरात सीसीटीव्हीसह अद्ययावत यंत्रणा
                  अमरावतीत सुरक्षितता यंत्रणेसाठी 2 कोटी रुपये     
अमरावती, दि. 7 : अमरावती शहरात सीसीटीव्ही यंत्रणा, टोईंग व्हॅन, क्रेन आदी सुरक्षितता यंत्रणेसाठी 2 कोटी रुपये तत्काळ देण्यात येतील, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व साधने शासनाकडून देण्यात येतील, असे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे सांगितले.
शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत नांदगावपेठ पोलीस ठाण्यातर्फे एमआयडीसी पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. एमआयडीसी उद्योग संघटनेचे अध्यक्ष किरण पातुरकर, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक पोलीस आयुक्त पंजाबराव डोंगरदिवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील आदी उपस्थित होते.
श्री. पोटे- पाटील म्हणाले की, औद्योगिक वसाहत विशेषत: वस्त्रोद्योग पार्कमध्ये रेमंडसारखे अनेक मोठे प्रकल्प सुरु झाल्याने शहराचा कायापालट होत आहे. नांदगावपेठ वसाहतीत 32 मोठे उद्योग आले असून, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावतीत झालेली गुंतवणूक लक्षणीय आहे. 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अमरावतीत होत असून, उद्योग व त्याला जोडून छोटे पूरक उद्योग व व्यवसाय यातून 60 हजार लोकांना रोजगार मिळेल. येथील उद्योगांकडून रोज 100 टन कापसाची मागणी होऊन, त्याचा फायदा कापूस उत्पादकांना मिळणार आहे. या वाढत्या औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस मदत केंद्राची गरज होती. ती आज पूर्ण होत आहे. अधिक मनुष्यबळ व साधनांसाठी स्वतंत्र चौकीसाठीही प्रयत्न करण्यात येतील.
ते पुढे म्हणाले की, समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस रात्रंदिन कार्यरत असतात. त्यांचे मनोधैर्य वाढविण्याची जबाबदारी आपली सर्व नागरिकांची असते. अमरावती शहरात पूर्वीच्या तुलनेत गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांनीही आपले शेजारी, परिसरातील नागरिक यांच्याशी संवाद ठेवून सुरक्षिततेची योग्य ती दक्षता घेतली पाहिजे. औद्योगिक वसाहतीत देश व राज्यातून विविध ठिकाणांहून येणा-या कर्मचारी- कामगारांची नोंदणी पोलीसांनी वेळोवेळी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
श्री. मंडलिक म्हणाले की, नवे उद्योग व निवासी क्षेत्र वाढण्याच्या शक्यता लक्षात घेऊन मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस रात्रंदिन झटत असतात. गतवर्षीच्या तुलनेत शहरात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे.  
श्री. पंडित यांनी आभार मानले.
00000





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती