मराठवाड्यातील दुष्काळावरील उपाययोजनांसाठी
इस्त्रायलच्या मेकोरोट कंपनीसोबत सामंजस्य करार
अपुऱ्या आणि अनियमित पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात सातत्याने उद्‌भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी इस्त्रायलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या शासकीय कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
सतत उद्‌भवणाऱ्या पाणी टंचाईमुळे 2016 च्या उन्हाळ्यामध्ये मराठवाड्याला 4000 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. याशिवाय तात्पुरत्या पाणी पुरवठा उपाययोजना हाती घ्यावा लागल्या होत्या. तसेच लातूर शहराला 300 किमीवर असलेल्या मिरज येथून रेल्वेद्वारे पाणी पुरवण्यात आले होते. या दुष्काळी परिस्थितीवर खात्रीशीर व कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून ग्रामीण तसेच शहरी भागाला पाणी पुरवठा करण्याच्या कायमस्वरुपी उपाययोजनांचा आराखडा आखण्यात येत आहे.
मराठवाडा विभागातील सरासरी पर्जन्यमान 700 मिमी एवढे असून हे पर्जन्यमान क्षेत्रनिहाय वेगवेगळे असल्याने उपलब्ध पाणीसाठा बऱ्याच वेळा पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा पुरेसा नसतो. मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी एकूण 17.92 टीएमसी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व शहरेगावे व वाड्यांना उपलब्ध असलेल्या पाटबंधारे जलसाठ्यांतून ग्रीड पद्धतीने किंवा इतर मार्गांनी पाणी पुरवठा करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने मराठवाड्याला ग्रीडद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी 6 डिसेंबर 2016 रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली.
अत्यंत कमी पर्जन्यमान असूनसुद्धा पाणी पुरवठ्याबाबत सक्षम व्यवस्था उभारण्यात यश आलेल्या मध्य-पूर्वेतील इस्त्रायलचा अनुभव महाराष्ट्रासाठी उपयोगाचा ठरु शकत असल्याने त्यांच्या याबाबतच्या ज्ञानाचा मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. मराठवाड्याची पाणी पुरवठ्याची सक्षम व्यवस्था उभारण्यासाठी सहकार्य करण्यासाठी इस्त्रायल सरकानेही उत्सुकता दाखवली असून इस्त्रायल शासनाच्या नॅशनल वॉटर कंपनीची उपकंपनी असलेल्या मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास आज मान्यता देण्यात आली. ही कंपनी इस्त्रायल सरकारचा स्वत:चा उपक्रम असून इस्त्रायलमधील 85 टक्के घरगुती पाण्याची व 70 टक्के पाण्याची मागणी या कंपनीद्वारे पूर्ण केली जाते.
या कंपनीद्वारे मराठवाड्यातील पाणी पुरवठ्यावर उपाययोजना आखण्यासाठी सरासरी पर्जन्यमानधरणाची साठवण क्षमताजलसंधारणपुनर्वापर,पुनर्चक्रीकरणनदी खोऱ्यांमध्ये उपलब्ध असणारे पाणीसमुद्राचे पाणी गोडे करणे इत्यादी सर्वंकष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी इस्त्रायल सरकारचे तांत्रिक सहाय्य घेण्यासाठी इस्त्रायल सरकारसोबत सामंजस्य करार करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. यासंदर्भात पुढील कार्यवाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्यानुसार इस्त्रायलचे प्रधानमंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
-----०००--

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती