घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण
ग्रामीण भागात सेवा देणा-या डॉक्टरांना उत्तम पॅकेज
-         सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत
अमरावती, दि. 19 : ग्रामीण महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याची तक्रार असते. त्यामुळे डॉक्टरांना, तसेच विशेषज्ञांना उत्तम वेतन व चांगले भत्ते  देण्याचा प्रस्ताव आहे. लवकरच हा निर्णय अंमलात येईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण समारंभात सांगितले.
          जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, आमदार वीरेंद्र जगताप, जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, आरोग्य सभापती बळवंतराव वानखेडे, पं. स. सभापती छबुताई जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.   
 डॉ. सावंत म्हणाले की, रुग्णाच्या वेदना समजावून घेऊन त्याच्यावर उपचार करणे व त्याच्या नातेवाईकाच्या भावनांचा आदर राखणे हे डॉक्टरचे कर्तव्य असते. त्याचप्रमाणे, डॉक्टर ग्रामीण भागात सेवेसाठी बाहेरून येत असतो. त्याच्यावर अनेक जबाबदा-या असतात. याची जाणीव ठेवत नागरिकांनीही त्याला सांभाळून घेतले पाहिजे. डॉक्टरांना 80 हजार ते 1 लाख वेतन, विशेषज्ञांना वेतनासह उत्तम इन्सेटिव्हचा प्रस्ताव आहे. तो लवकरच अंमलात येईल. आरोग्य केंद्रातील निवासस्थानांचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नांदगाव खंडेश्वर येथील ट्रामा केअर युनिटसाठी आवश्यक विशेषज्ञ देण्यात येतील, असेही ते म्हणाले.
चांदूर रेल्वे येथे उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य यंत्रणेतील वर्ग 3 व 4 च्या भरतीसाठी कृती आराखडा मंजूर करुन मिळावा, अशी मागणी श्री. जगताप यांनी केली. प्रवीण घुईखेडकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. चव्हाटे यांनी आभार मानले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती