ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ
देशाप्रतीची जबाबदारी ओळखून निधी संकलनात सहभागी व्हावे
         -         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती. दि.20 :  देशाच्या रक्षणासाठी सैनिक रात्रंदिवस झटत असतात. अशा वीर जवानांच्या कुटुंबियांच्या हिताची काळजी घेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. देशाप्रतीची आपली जबाबदारी ओळखून ध्वजदिन निधी संकलनाच्या उपक्रमात सहभागी होऊया, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.
‘ध्वजनिधी 2017’ साठी शासनाने अमरावती जिल्ह्याला 99 लाख 60 हजार रुपयांचे उदिष्ट दिले असून, त्याचा शुभारंभ  पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांच्या हस्ते नियोजनभवनातील कार्यक्रमात झाला. त्यावेळी ते बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल धनंजय सदाफळ, श्रीशिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. पोटे- पाटील म्हणाले की, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असते. देशासाठी प्राणाची पर्वा न करता लढणा-या सैनिकांच्या कुटुंबियांना आधार देण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे.
पालकमंत्र्यांकडून 1 लाख रुपयांची देणगी
पालकमंत्र्यांनी यावेळी ध्वजदिन निधी संकलनासाठी 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. वर्धा जिल्ह्यातील वडाळा हे माझे मूळ गाव आहे. या गावातील 87 लोक देशासाठी शहिद झाले आहेत. शहिदांप्रती कृतज्ञता म्हणून शहिदांच्या पाल्यांसाठी आपल्या संस्थेतर्फे शिक्षण शुल्कात सवलत देण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.  श्री. वाकडे यांनी मनोगत व्यक्त केले.  
शहीद जवानांच्या वीरपत्नी ,वीरपिता, शौर्यपदकप्राप्त सैनिक यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. वीरपत्नी गुंफाबाई कलसाईत, वनमाला गेठे, कांताबाई सांगोले, नूतन खांडेकर, सरस्वती मासोदकर, सुनीता म्हसांगे, रेणुका धांडे, मनुताई चौहान आदींचा सत्कार झाला. वीरमाता बेबीताई उईके यांना गौरविण्यात आले. गौरव दीपटे, रोहन खंडारे, सागर नडनखे, ऋतुजा धांडे, वैष्णवी राऊत, साक्षी अडसूळ आदी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कारही यावेळी झाला.   
श्रीशिवाजी शिक्षण संस्थेने निधी संकलनासाठी सहकार्य केल्याबद्दल संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. इंगोले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.  
देशाच्या संरक्षणासाठी  प्राणार्पण करणा-या जवानांच्या कुटुंबीयांना, तसेच युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वजनिधीची तरतूद आहे, असे श्री. सदाफळ यांनी प्रास्ताविकात सांगितले.
00000













Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती