Wednesday, January 17, 2018

उद्योगांना पायाभूत सुविधा पुरविण्यात महाराष्ट्र अग्रेसर
- मुख्यमंत्री फडणवीस
नवी दिल्ली, 16 : मुंबईत गेल्यावर्षी झालेल्या मेक इन इंडिया जागतिक परिषदेत 8 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले, त्यापैकी प्रत्यक्षात 4.5 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यात महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत देश-विदेशातील गुंतवणूकदारांना दिली.
मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 जागतिक परिषदे विषयी माहिती देण्यासाठी येथील हॉटेल ताज मानसिंग मध्ये आयोजित विविध कंपन्यांचे मुख्यकार्यकारी अधिकारी व राजदूतांसोबत राऊँड टेबल बैठकीत श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेसी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी उपस्थित होते.
        मुख्यमंत्री म्हणालेराज्याने गेल्या तीन वर्षात औद्योगिक क्षेत्रात अग्रस्थान मिळविले आहे. देशाच्या एकूण परकीय गुंतवणूकी पैकी 50 टक्के परकीय गुंतवणूक राज्यात झाली आहे. उद्योगांसाठी लागणारी पायाभूत सुविधा तसेच निर्यात आणि वित्त क्षेत्रातही राज्य आघाडीवर आहे. राज्याचा विकासदर दुहेरी आकड्यात आहे. अर्थव्यवस्थेची हिच गती कायम ठेवत येत्या 7-8 वर्षात राज्याला देशातील ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविणार असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषद 2018यासाठी पुरक ठरेल असा विश्वास व्यक्त करत श्री. फडणवीस यांनी देश-विदेशातील गुंतवणूकदारांना मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
            राज्यात 2016 मध्ये मेक इन महाराष्ट्र ही जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राज्याशासनाचे सर्व विभाग मिळून 8 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. यातील 51 टक्के प्रकल्प हे प्रत्यक्ष कार्यरत आहेत. प्रस्तावित गुंतवणूकीच्या 61 टक्के प्रत्यक्ष गुंतवणूक झाली आहे. यातून अपेक्षित रोजगार निर्मिती पैकी 74 टक्के रोजगार निर्माण झाले असल्याची माहितीही श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.
दिनांक 18 ते 20 फेब्रुवारी 2018 दरम्यान मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन 2018या जागतिक गुंतवणूक परिषदेत राज्याची उद्योग क्षेत्रातील भरारी, उद्योग क्षेत्रासाठी असलेले पूरक वातावरण औद्योगिक वृद्धी मध्ये असलेले राज्याचे योगदान व या दिशेने राज्याची असलेली तयारी दर्शविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित विविध कंपन्यांचे मुख्यकार्यकारी अधिकारी व राजदूतांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री यांनी समर्पक उत्तरे दिली.
मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत भरगच्च कार्यक्रम
उद्योग मंत्री सुभाष देसाई
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले, ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन 2018या जागतिक गुंतवणूक परिषदेच्या तीनही दिवशी भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत. त्याचा गुंतवणूकदारांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. 2 वर्षापूर्वी राज्यात आयोजित मेक इन इंडिया परिषद यशस्वी झाली. आता मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदही यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेक इन इंडिया परिषदेद्वारे राज्यात आलेली गुंतवणूक व रोजगार निर्मितीं तसेच राज्यात उपलब्ध असलेले उद्योग पुरक वातावरण आदींची माहिती त्यांनी यावेळी दिली.
एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी उपस्थितांना संबोधित करताना या परिषदेत सहभागी होण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स 2018या स्मार्टफोन अप्लिकेशन आणि परिषदेविषयीची सर्व माहिती पुरवणाऱ्या www.midcindia.org/convergence2018/registration या संकेतस्थळावर नोंदणी व माहिती मिळविण्याचे आवाहन केले. नवोदित व तरुण व्यावसायिकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने या परिषदेत मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर ३०या स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...