भारतीय प्रजासत्ताकाचा 68 व्या वर्धापनदिन सोहळा उत्साहात
          सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वाटचाल
                                      - पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 26 : शेतकरी हिताच्या विविध योजना, सर्वदूर पायाभूत सुविधांची निर्मिती, नव्या उद्योगांची सुरुवात व मोठी रोजगारनिर्मिती यामुळे अमरावती जिल्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले. विकासाची ही वाटचाल यापुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.   
भारतीय प्रजासत्ताकाच्या 68 व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त ध्वजवंदन व संचलनासह मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. सोहळ्यात खासदार आनंदराव अडसूळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधीक्षक अभिनाशकुमार, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.
          सोहळ्यात प्रारंभी ध्वजवंदन व राष्ट्रगीत झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या भाषणातून जिल्ह्यातील विकासप्रक्रियेचा वेध घेतला. ते म्हणाले की, कृषी, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानामुळे महाराष्ट्राने देशातील सर्वोत्तम राज्याचा लौकिक कायम राखला आहे. विकासाच्या या वाटचालीत अमरावती जिल्हाही राज्यात आघाडीवर आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबरोबरच कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आणि खारपाणपट्टयातील परि‍स्थितीचा विचार करुन संपूर्ण कायापालटासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणि अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बळीराजा जलसंजीवनी योजना  राबविण्यात येत आहे.
ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानामुळे 21 लाख हेक्टरहून अधिक सिंचन क्षमता त्यामुळे जिल्ह्यात निर्माण झाली. 21 हजारांहून अधिक कृषी पंप वीज जोडण्या, सौर पंप वितरण, मागेल त्याला शेततळे यासारख्या कल्याणकारी योजनेमुळे कृषी उत्पादकताही वाढली आहे. अभियानात 2015 ते 2017 या काळात 506 गावात कामे करण्यात आली. 2017-18 साठी 252 गावांमध्ये कामे सुरु आहेत.  शेतकरी सन्मान योजनेत आजमितीला सुमारे 474 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. उर्वरित काम गतीने सुरु आहे. शेतक-यांना सुमारे 468 कोटी  रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, या प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे.  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात विविध योजनांसाठी 500 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

ते पुढे म्हणाले की, कडधान्य पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, उन्नत शेती- समृद्ध शेतकरी अभियान व  शेतक-यांना अवजार- यंत्रासाठी अनुदान, 2 लाखांहून अधिक मृद आरोग्य पत्रिकांचे  वितरण, शेतक-यांना प्रशिक्षण, महात्मा फुले जलभूमी अभियान, सामूहिक शेतीतून विकासासाठी गटशेती योजना,  कोरडवाहू क्षेत्र विकासासाठी पशुधन विकासावर भर,  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून पॉलिहाऊस, सामूहिक शेततळे, संत्रा पुनरुज्जीवन, सूक्ष्म सिंचन कार्यक्रम आदी योजनांची भरीव अंमलबजावणी शेतीच्या प्रगतीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी ठरत आहे.  
बळीराजा जलसंजीवनी योजनेतून जिल्ह्यातील 24 अपूर्ण प्रकल्प पूर्ण होऊन सिंचनक्षेत्रात मोठी वाढ होईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की,  जिल्ह्यातील 5 मध्यम आणि 19 लघु प्रकल्प यातून पूर्ण होऊन सिंचन क्षेत्र वाढून शेतक-यांचे जीवनमान आणखी उंचावणार आहे.
नव्या उद्योगांना आरंभ
ते पुढे म्हणाले की, नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत रेमंड, श्याम इंडोफॅबसारख्या 18 नामांकित वस्त्रोद्योगांची सुरुवात ही घटना अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल. तिथे इतर नवीन 12 उद्योगांना जागा देण्यात आली आहे. 19 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 30 हजारहून अधिक लोकांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळाला आहे.  भविष्यात ही वाढ गतीने होऊन रोजगारनिर्मितीचा वेग वाढेल. ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’अंतर्गत परवानग्यांची कमी केलेली संख्या आणि ‘मेक इन महाराष्ट्र’अंतर्गत नवीन उद्योगांची सर्वदूर पायाभरणी यामुळे राज्यातील गुंतवणूकीला मोठी गती मिळाली. उद्योजकता प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमातून युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, शेतक-यांना 12 तास वीज पुरवठ्याचा निर्णय शासनाने अंमलात आणला  आहे. मेळघाटातील  12 गावांना सोलर बँकेद्वारे वीजपुरवठ्याची प्रक्रिया होत आहे.  ग्रामीण भागात 23 व शहरी भागात 7 वीज उपकेंद्राची उभारणी होत आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, अमृत राष्ट्रीय पेयजल योजना व भुयारी गटार योजनेत 500 कोटी रुपयांची कामे होत आहेत.   ‘सर्वांसाठी घरे’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार प्रधानमंत्री आवास योजनेत 2022 पर्यंत प्रत्येक गरजूला घर मिळणार आहे.   स्वत:ची जागा नसलेल्यांसाठी पं. दीनदयाळ उपाध्याय भूखंड खरेदी योजनेत 50 हजार रुपये देण्यात येत आहेत. या योजनेची भरीव अंमलबजावणी होत आहे.
पायाभूत सुविधांबाबत ते म्हणाले की, जिल्ह्यात 15 हजार कोटी रुपयांच्या निधीतून विविध रस्त्यांची निर्मिती होत आहे. जिल्ह्यातील 243 किलोमीटर लांबीच्या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले, तसेच 267 लांबीच्या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर प्रस्तावित आहे. सुमारे 5000 किलोमीटर लांबीचे 923 पांदणरस्ते निर्माण करणारी पालकमंत्री पांदणरस्ते योजना अमरावती जिल्ह्यानंतर राज्यभर राबविण्यात येत आहे, अमरावती विमानतळ विकासाचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला देण्यात आले आहे. लवकरच येथून विमानसेवा सुरु होईल. अमरावतीत जिल्हा क्रीडा संकुलाचे काम होत आहे.
ते पुढे म्हणाले की, जिल्हापरिषदेमार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी 908 कोटी व कृषी विभागाच्या विविध योजनांना 174 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.   मेळघाटातील कुपोषणाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी स्थानिक  कर्मचारी  नागरिकांच्या मदतीने प्रभावी संपर्क यंत्रणा,तातडीची आरोग्य  सेवा, स्थलांतर रोखण्यासाठी रोजगारनिर्मिती  विविध यंत्रणांच्या समन्वयामुळे मातामृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. मेळघाटातील दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्यासाठी टेलिमेडिसीनव्दारे सुमारे 4 हजार रुग्णांना सल्ला व औषधोपचार करण्यात आले. तिथे मोटरबाईक रुग्णवाहिका ही कार्यान्वित होणार आहे. तेथील स्थलांतर रोखण्यासाठी रोजगारनिर्मितीही करण्यात येत आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त अमरावती येथे 250 मुलींचे, तर दर्यापूर येथे 100 मुलींचे शासकीय वसतिगृह सुरु झाले.  डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेसह विविध योजनांतून झालेल्या कामांचाही त्यांना उल्लेख केला. खासदार आनंदराव अडसूळ यांच्या निधीतून रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील गुणवंतांना गौरविण्यात आले.
उद्योजक पुरस्कारांचे वितरण
जिल्हा उद्योग कार्यालयातर्फे उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत उद्योजकांना जिल्हा उद्योजक पुरस्कार देण्यात आला. उद्योजक समीर भरत शहा (शहा शांतीलाल मगनलाल अँड कंपनी, अमरावती) यांना प्रथम क्रमांक, तर उद्योजक राजेश गुलराज बजाज (बजाज फूड इंडस्ट्रीज) यांना द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
पोलीस पुरस्कार
नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार (पोलीस महासंचालकांतर्फे)- पंकज दाभाडे (पोलीस निरीक्षक), अशोक चवरे (प्रमुख यंत्रचालक), गोवर्धन निंबाळकर (रेडिओ यांत्रिकी), संजयकुमार पिंगे (वीजतंत्री).
पोलीस आयुक्तांतर्फे पुरस्कार- दिलीप वाघमारे (सहा. पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा)
वन विभागाचे पुरस्कार
अमरावती उपवनसंरक्षक विभागातर्फे पूर्व मेळघाट वनविभागातील आलाडोह संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव खडके व वनरक्षक प्रभुदास चौधरी यांना 51 हजार रुपये रकमेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दुस-या क्रमांकाच्या पुरस्कारासाठी कारली येथील समितीचे अध्यक्ष सुखदेव भुसूम व वनपाल डी. एन. पवार यांनी 31 हजार रुपये रकमेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तिस-या क्रमांकाचा 11 हजार रुपयांचा पुरस्कार बोरी पश्चिम येथील समितीचे अध्यक्ष शिवाजी युवनाते, सचिव हर्षवर्धन सराटकर, वनक्षेत्रपाल डी. एस. काळे यांना देण्यात आला.

आरोग्य सेवा (हिवताप) पुरस्कार
 कीटकजन्य आजाराविषयी उत्कृष्ट कार्य- जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश तरोडेकर. आरोग्य सहायक पदावर उत्कृष्ट कार्य- सुरेशचंद्र माणिकपूर (पळसखेड) आदिवासीबहुल क्षेत्रात आरोग्य शिक्षण व विविध उपक्रम राबविल्याबाबतजयंत औतकर (जिल्हा हिवताप कार्यालय).
क्रीडा पुरस्कारांचे वितरण
यावेळी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे गुणवंत खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 10 हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
गुणवंत खेळाडू (मुली) - वैष्णवी सतीश श्रीवास (जलतरण), गुणवंत खेळाडू (दिव्यांग)- जुनेद खान सलीम खान- फुटबॉल, ममता कोळमकर (गोळाफेक व थाळीफेक), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- प्रा. मनोज तायडे (कुस्ती), गुणवंत क्रीडा कार्यकर्ता, संघटक- नितीन जाधव (क्रीडा प्रसारासाठी योगदान), विशेष पुरस्कार- दीक्षा प्रदीप गायकवाड (वेटलिफ्टिंग) व आयुष नवजीवन धोटे (रोलर स्केटिंग).
विविध पुरस्कार
राष्ट्रीय कुष्ठरोग परिषदेचा पुरस्कार- तुकाराम आऊलकर (सहायक संचालक, आरोग्य),
स्काऊट गाईड पुरस्कार- अभिषेक यादव, शंतनू इंगळे, कुणाल भोरे, वेदांत बुरंग, सोनाली मंडाळकर, निकिता वडे, साक्षी कुरील, आरती कुशवाह, साक्षी माहोरे, वृतिका ढगे, परिता दंड, वैदेही आळशी.
हरियाणा येथे भारताद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा पुरस्काराने सन्मानित- मनीष गवई, अमरावती.

चित्तथरारक कवायती
राज्य राखीव पोलीस दलाच्या पथकाने यावेळी चित्तथरारक मोटरसायकल प्रात्यक्षिके सादर केली. पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलतर्फे बँड ड्रील, संत गाडगेबाबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम कवायत आणि रामकृष्ण क्रीडा विद्यालय व आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स कवायत सादर केली. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. बुलेटवर चित्तथरारक व रंजक कवायत सादर करुन महावीर वरहरे यांनी उपस्थितांना जिंकून घेतले.   

00000











Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती