मोर्णा स्वच्छता मोहिमेची मा. पंतप्रधानांनी घेतली दखल
मन की बातमध्ये मोर्णा स्वच्छता मोहिमेचे केले कौतुक
एकजुटीने अकोलेकरांनी मोर्णा नदीची केलेली स्वच्छता प्रशंसनीय
    --- पंतप्रधान नरेंद्र मोदी  

अकोला, दि. 28    जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ बनलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेची आज स्वत: मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखली घेतली. आपल्या मन की बातया कार्यक्रमातून त्यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले. एखादे चांगले काम करण्याचा ठाम निश्चय केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नाही, या भावनेतूनच अकोल्याच्या लोकांनी एकजुटीने मोर्णा नदीची केलेली स्वच्छता प्रशंसनीय आहे, याबददल मी अकोल्याच्या जनतेचे, तेथील प्रशासनाचे अभिनंदन करतो, आपला हा उपक्रम देशातील इतर लोकांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल, या शब्दांत पंतप्रधानांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले.
दूरदर्शन, आकाशवाणी आणि इतर प्रसार माध्यमांवरुन मा. पंतप्रधान यांचा मन की बात हा कार्यक्रम प्रसारीत होत असतो. आज रविवारी प्रसारीत झालेल्या त्यांच्या या कार्यक्रमात मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेचा उल्लेख आला. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 13 जानेवारी 2018 पासून लोकसहभागातून सुरु झालेल्या या मोहिमेमुळे जलकुंभी व कचऱ्याने भरलेली ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ झाली आहे.
मोर्णा स्वच्छता मोहिमेची दखल पंतप्रधानांनी घेतल्यामुळे अकोलेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आजच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंगेशने नरेंद्र मोदी ॲपवर पाठविलेल्या फोटोकडे माझे लक्ष वेधले गेले. त्या फोटोमध्ये एक नातू आपल्या आजोबांसोबत मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेला दिसत होता. नंतर मला कळले की, अकोल्याचे नागरिक स्वच्छ भारत अभियानातंर्गत मोर्णा नदी स्वच्छता मोहिम राबवित आहेत. पूर्वी मोर्णा नदी बाराही महिने वाहत होती. परंतु आता जलकुंभी व कचऱ्याने ती भरलेली होती.  तिच्या स्वच्छतेसाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला. १३ जानेवारी रोजी मोर्णा स्वच्छता मोहिमेतंर्गत नदीच्या चार किलोमीटर क्षेत्रात चौदा ठिकाणांवरून लोकसहभागातून नदीची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात ६ हजारांपेक्षा जास्त नागरिक, शंभरापेक्षा जास्त सामाजिक संस्था, विदयार्थी, मुले, वृध्दांसह प्रत्येकाने भाग घेतला. २०  जानेवारीलाही नदी स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात आली. मला सांगण्यात आले की, नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत दर शनिवारी ही मोहिम सुरुच राहणार आहे. यातून असे दिसून येते की, एखादे चांगले काम करण्याचा निश्चिय केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नाही, लोकसहभागातून मोठे परिवर्तन घडू शकते.  अकोल्याच्या लोकांनी एकजुटीने मोर्णा नदीची केलेली स्वच्छता प्रशंसनीय आहे, याबदृल मी अकोल्याच्या जनतेचे, तसेच तेथील जिल्हा व महानगर पालिका प्रशासनाचे अभिनंदन करतो, आपला हा उपक्रम देशातील इतर लोकांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले अकोलेकरांचे अभिनंदन
मन की बात या कार्यक्रमात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे केलेल्या कौतुकाबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेच्या यशाचे श्रेय अकोलेकरांना दिले आहेजिल्हाधिकारी म्हणाले की, मोर्णा स्वच्छता मोहिमेची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन मोहिमेचे कौतुक केले आहे. या मोहिमेत सहभागी झाल्याबदृल सर्व अकोलेकरांचे मी अभिनंदन करतो.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, यांच्यासह मोहिमेत सहभागी झालेले  लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार, विदयार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, एनएनसीचे विदयार्थी, व्यापारी, पोलीस, महिला, वयोवृध्द नागरिकांनी मोहिमेत सहभाग घेतल्याबदृल जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्वांचे अभिनंदन करुन त्यांचे आभार मानले.




Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती