Saturday, January 13, 2018

 ऋणमोचन येथे पशुप्रदर्शन व शेतकरी मेळाव्याला मोठा प्रतिसाद
                                          शेतीपूरक व्यवसायांना शासनाचे संपूर्ण सहकार्य
-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील

          अमरावती, दि. 13 : शेतक-यांनी शेतीबरोबरच पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आदी पूरक व्यवसायही केले पाहिजेत. या व्यवसायातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी केले.

          श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन येथे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग व भातकुली पंचायत समितीतर्फे भव्य पशुप्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. खासदार आनंदराव अडसूळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ ढोमणे, बांधकाम सभापती जयंतराव देशमुख, अर्थ सभापती बळवंतराव वानखडे, महिला व बालकल्याण सभापती वनिता पाल, भातकुली पंचायत समितीच्या सभापती करूणाताई कोलटके, नांदेड (बु.) च्या सरपंच हर्षा चौधरकर आदी उपस्थित होते.
          श्री. पोटे- पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात पूरक व्यवसायांना उत्तेजन देण्यासाठी प्रदर्शन व मेळाव्यांचे आयोजन प्रत्येक तालुक्यात होत आहे. शेतीवर नैसर्गिक संकट आल्यास पूरक व्यवसाय तारुन नेतात. हे लक्षात घेऊन पशुधनवाटप, पशु विमा आदी अनेक योजना शासनाने सुरू केल्या आहेत. शेतक-यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे.  
 श्री. अडसूळ म्हणाले की, शेती पावसावर व शेतकरी शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत पूरक जोडधंदा असणे उपयुक्त ठरते. तरूणांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीचा प्रसार केला पाहिजे.     
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय राहाटे यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार विजयराज शिंदे, ज्ञानेश्वर धाने-पाटील, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यपालन अधिकारी विनय ठमके, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे, जि. प. सदस्य मयुरीताई कावरे, सुखदेवराव पवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  
          शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला हजेरी लावली. पशुपालकांकडून उत्कृष्ट गाई, बैल, म्हशी, वळू, घोडे, मेंढी, शेळी यांचे प्रदर्शन करण्यात आले. कडकनाथ कोंबडी, बटेर, देशी कोंबडी आदींचा प्रदर्शनात समावेश होता. परलाम येथील गीर गाय डेअरी फार्मला सर्वोत्कृष्ट दुधाळ जनावर पालनासाठी 10 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...