सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाचे
देशाच्या विकासात मोठे योगदान राहील
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 10 :  कौशल्य विकास हा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा पाया आहे, भारतातील लोकसंख्येत तरुणांची संख्या मोठी आहे, या तरुण लोकसंख्येला कौशल्य विकासाची जोड दिल्यास देश जगात मोठी अर्थसत्ता म्हणून उदयाला येईल. सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठ हे आंतराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ असून देशाच्या विकासात या विद्यापीठाचे मोठे योगदान राहिल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
किवळे, जि. पुणे येथील सिम्बायोसिस स्किल ॲण्ड ओपन युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात सिम्बायोसिस स्किल सेंटर ऑफ एक्ससिल्लेन्सचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिम्बायोसिसचे संस्थापक, अध्यक्ष पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, प्र. कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार, श्रवण कर्डेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कौशल्य विकास विद्यापीठ ही अत्यंत अभिनव आणि उपयुक्त संकल्पना आहे. बाजारपेठेत आणि औद्योगिक क्षेत्रात आज कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. आपल्या देशाच्या लोकसंख्येत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. या तरुणांना कौशल्य विकासाची जोड दिल्यास ती आपल्या देशाची मोठी ताकद होईल. हे मानव संसाधनच आपल्या देशाचे बलस्थान आहे. या बलस्थानाच्या माध्यमातून जगाच्या आर्थिक पटावर आपला देश पुढे जावू शकतो.
सिम्बायोसिस कौशल्य विकास विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ तयार झाले आहे. पारंपारिक शिक्षण हे कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीत कमी पडते. या विद्यापीठाच्या माध्यमातून ही कमतरता भरून निघणार आहे. व्यवसासिक शिक्षणाला सामाजिक‍ स्वीकार्हता कमी असल्याने विद्यार्थी या शिक्षणाकडे कमी प्रमाणात वळत आहेत. मात्र या विद्यापीठाच्या निर्मितीमुळे ही समस्या सुटली आहे, या विद्यापीठातील अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात याकडे वळतील. या विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार करताना अधिकाकाधिक प्रात्यक्षिकावर भर दिला आहे. त्याचा फायदा कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी होणार आहे.
औद्योगिक क्षेत्रातील गरज लक्षात घेवून विविध उद्योग समूहांच्या मदतीने या विद्यापीठात अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या विद्यापीठाच्या प्रांगणात स्थापन करण्यात आलेल्या कौशल्य शिक्षणाच्या कार्यशाळा आणि औद्योगिक केंद्रांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. परिवर्तनशील शिक्षणाच्या विविध मार्गामुळे हे विद्यापीठ पारंपारिक विद्यापीठांपेक्षा वेगळे ठरले आहे. आपल्या बाजारपेठेत असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची मागणी या विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. यापुढे शिक्षण संस्था आणि उद्योग यांनी कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी एकत्र येण्याची गरज आहे. हे विद्यापीठ शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योजक यांच्यातील दुवा बनण्याचे काम करेल.
अत्यंत कमी वेळेत या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली असून अत्यंत देखणे विद्यापीठ उभे राहिले आहे. देशाच्या जडणघडणीसाठी हे विद्यापीठ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. देशातील इतर विद्यापीठांना हे विद्यापीठ मार्गदर्शक ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कौशल्य विकास हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा असून ते या वैशिष्ट्यपूर्ण विद्यापीठाला ते निश्चितच भेट देतील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. 
डॉ. शां.ब. मुजुमदार म्हणाले, कौशल्य विकास हा भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा पाया आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्कील इंडिया आणि मेक इन इंडिया या योजनेला बळकटी देण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून तरुणांना कौशल्य विकासाचे शिक्षण देऊन रोजगार निर्मिती होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठातील वर्कशॉपसह विविध दालनांना भेट देऊन विद्यापीठाच्या शैक्षणिक कामकाजाची माहिती घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वाती मुजुमदार यांनी केले तर आभार डॉ. श्रावण कर्डेकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला विद्यापीठातील विविध विभागात शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिम्बायोसिस स्कील अँड ओपन युनिवर्सिटीची वैशिष्ट्ये:
·         कौशल्य विकास देणारे मुक्त विद्यापीठ.
·         अभ्यासक्रमात ७० टक्के प्रात्याक्षिके व ३० टक्के थेअरी.
·         अद्ययावत प्रशिक्षण प्रयोगशाळा आणि कार्यशाळा.
·         नामांकित कंपन्या तसेच जर्मनी विद्यापीठाशी संलग्नता.
·         महिला व युवकांचे सबलीकरण.
·१५ एकराच्या विस्तीर्ण जागेत विद्यापीठाची अद्यावत इमारत.
·         पारंपारिक शिक्षणाला कौशल्य विकासाची जोड.

००००





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती