राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराचे शानदार समारंभात वितरण
जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्याबद्दल अमरावतीचे तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचा गौरव

अमरावती, दि. 5 : सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत सन 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अमरावतीचे तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अभियानाच्या उत्कृष्ट वृत्तांकनाबद्दल एबीपी माझा वृत्तवाहिनीचे अमरावती येथील प्रतिनिधी शशांक चवरे यांना यावेळी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात काल झालेल्या सोहळ्यात जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम झालेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ति,संस्था, अधिकारी व पत्रकारांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर,जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, मृद व जलसंधारण राज्य मंत्री विजय शिवतारे, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.  
  गेल्या तीन वर्षात राज्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी तसेच सरकारी यंत्रणांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यातील अकरा हजार गावे जलपरिपूर्ण झाली असून या वर्षी आणखी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. जलयुक्तमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झाले असून या गतीने पुढील दोन वर्षे कामे केली तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
अमरावती जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात  753 गावात 18 हजार 524 कामे करण्यात आली असून, 1 लाख हेक्टरहून अधिक सिंचन क्षमता निर्माण झाली. अभियानाच्या सुरुवातीपासूनच अमरावती जिल्ह्याने विभागात आघाडी घेतली.  तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांनी जिल्ह्यातील अनेक गावांत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण केली, तसेच वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून  लोकसहभाग मिळवत कामांना गती देण्यात आली. त्यामुळे विभागातून पुरस्कारासाठी अमरावती जिल्ह्याची निवड करण्यात आली.
 पत्रकारांसाठीचा प्रथम पुरस्कार अविनाश अंकुशराव कदम, दै.पुण्यनगरी, पुणे; द्वितीय पुरस्कार संदीप दत्तू नवले, ॲग्रोवन,अहमदनगर; तृतीय पुरस्कार श्रीमती संगिता हनुमंतराव भापकर, दै.सकाळ यांना, तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रथम पुरस्कार रवींद्र शिवाजी कांबळे, सांगली; द्वितीय पुरस्कार शशांक रमेश चवरे, अमरावती;तृतीय पुरस्कार शशिकांत पाटील, लातूर यांना देण्यात आला.  

00000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती