‘शिवराज्याभिषेक सोहळाचित्ररथ  ठरला
प्रजासत्ताक दिन संचलनात देशात प्रथम

        नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्राच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील पथ संचलनात सादर केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा' या विषयावरील चित्ररथाला देशात पहिला क्रमांक मिळाला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांनी आज हा पुरस्कार स्वीकारला.
राजपथावर  राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि आशियान देशांच्या 10 राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत भारताचा 69 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात पार पडला. या निमित्त आयोजित पथसंचलनात देशातील विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शित करण्यात आले. 14 राज्य व केंद्रीय मंत्रालयाचे 9 चित्ररथ यावर्षी प्रदर्शित झाले. यामध्ये महाराष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेला 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा' या चित्ररथाची  पथसंचलनातील सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवड झाली. येथील कॅंन्टॉन्मेट भागातील रंगशाला शिबिरात आयोजित शानदार कार्यक्रमात संरक्षण मंत्री श्रीमती सितारमन यांच्या हस्ते  राज्याला गौरविण्यात आले.  मानपत्र आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. नरेंद्र विचारे, कला दिग्दर्शक नितीन देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आसाम राज्याने यावर्षी  दुसरा तर छत्तीसगड़ राज्याने तिसरा क्रमांक पटकविला. या राज्यांनाही यावेळी गौरविण्यात  आले.
शिवराज्याभिषेक सोहळा ठरला देशात पुन्हा प्रथम
       महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्टय दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. यापूर्वी 1980 मध्येही राज्याच्यावतीने शिवराज्याभिषे दर्शविणारा चित्ररथ प्रदर्शीत केला होता. यास प्रथम पारितोषिक मिळाले होते. 1983 मध्ये बैल पोळा या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर 1993 ते 1995 असा सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. 2015 मध्ये प्रदर्शित पंढरीची वारी या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला ही उल्लेखनीय बाब आहे.                            
यावर्षी 'शिवराज्याभिषेक सोहळा'  चित्ररथाची बांधणी जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली. चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी तयार केले होते.  चित्ररथावर शिवराज्याभिषेक सोहळा दर्शविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सोयराबाई, संभाजी राजे आदी 10 भूमिका साकारण्यात आल्या. मुंबई येथील भैरी भवानी ग्रुपच्या कलाकारानी  या भूमिका साकारल्या.

नागपूरच्या दक्षिण-मध्य केंद्राला प्रथम पुरस्कार 
राजपथावरील पथ संचलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात राज्याचे सांस्कृतिक मंत्री अध्यक्ष असलेल्या नागपूर येथील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राला प्रथम पुरस्काराने आज गौरविण्यात आले. या केंद्राचे संचालक इंद्रजित ग्रोवर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या केंद्राच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्याचे बरेदी लोकनृत्य सादर करण्यात आले होते.
                          
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती