Saturday, January 20, 2018

शिक्षण विभागातर्फे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

विज्ञानाच्या रुचीतून विद्यार्थ्यांत संशोधनवृत्तीचा विकास

-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि.20 : विद्यार्थ्यांना विज्ञान- तंत्रज्ञानाची गोडी लागल्यामुळे त्यांच्यात संशोधनवृत्तीचा विकास होतो. समाजातील संशोधनवृत्ती व उद्यमशीलता वाढावी व विकासाला गती देण्याचा प्रयत्न ‘स्टार्टअप इंडिया’, कौशल्य विकाससारख्या योजनांतून होत आहे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी येथे सांगितले.
 जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जिल्हा मुख्याध्यापक संघ, शैक्षणिक विचार मंच व के. के. केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती जयंतराव देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, शिक्षण समिती सदस्य श्याम मसराम, श्री. भलावी, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते.
श्री. पोटे- पाटील म्हणाले की, ज्ञानदानासारखे पवित्र कार्य दुसरे कुठलेही नाही. अनेकदा छोट्या कारणांसाठी विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहते. अशावेळी संस्था व नागरिकांनीही सामाजिक बांधीलकीतून पुढाकार घेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे. प्रत्येक अधिका-याने एक मुलगा शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे आवाहन मी प्रशासनाला यापूर्वीच केले आहे. माझ्या संस्थेच्या माध्यमातून 13 हजार विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे, असेही ते म्हणाले.   
यावेळी पालकमंत्र्यांनी प्रदर्शनात सहभागी प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रयोगाविषयी माहिती घेतली व त्यांचे कौतुक केले. प्रदर्शनात जिल्हाभरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग प्रकल्प सादर केले आहेत.





No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...