शासकीय औषध व यंत्रसामुग्री खरेदी
हाफकीन महामंडळाकडून करण्याबाबत प्रस्ताव सादर करा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 11 : आरोग्य, वैद्यकीय शिक्षण यांच्यासह सर्वच शासकीय विभागांनी औषधे व यंत्रसामुग्री हाफकीन महामंडळ मार्फतच करावी. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
औषधे व यंत्र सामुग्री खरेदी संदर्भात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनअन्न व औषध प्रशासन विभाग मंत्री गिरीश बापटआरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यावेळी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले, आरोग्यवैद्यकीय शिक्षण या बरोबरच आदिवासी विकास विभागमहिला व बालविकास विभागशिक्षण विभागशासकीय मंडळांना लागणारी औषधे व यंत्रसामुग्री यासाठी हाफकीन महामंडळमध्ये खरेदी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यापुढे कुठलाही विभाग औषध खरेदी हाफकीन महामंडळा व्यतिरिक्त अन्यत्र खरेदी करणार नाही. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत सादर करावा अशा सूचना देत औषधांची मागणीपुरवठा व वापर यांची सांगड घालणारे मोड्युल तयार करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
            प्रत्येक विभागाने औषध खरेदीची तालिका तयार करावे. सार्वजनिक आरोग्य विभाग वापर करीत असलेल्या ‘ई-औषधी’ या सॉफ्टवेअरचा वैद्यकीय शिक्षण विभागाने देखील अवलंब करावा. त्याचबरोबर दोन्ही विभागांनी आपली यंत्रणा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणावी. हाफकीन महामंडळातील खरेदी कक्षासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे व त्याबाबत आकृतीबंध तयार करावा, अशी सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
            सर्व विभागांची औषधे व उपकरणे यांचा पुरवठा करण्यासाठी १४ ऑगस्ट २०१७ रोजी हाफकीन महामंडळामध्ये खरेदी कक्ष सुरु करण्यात आला. पारदर्शकतेसाठी निविदा जाहिराती, शुद्धीपत्रके, बैठकांचे इतिवृत्त तसेच पुरवठा आदेश याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या खरेदी कक्षामध्ये तीन समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यामध्ये निविदा मान्यता समिती, निविदा निवेदन समिती व विनिर्देशन समिती समावेश आहे. महामंडळाला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 79 कोटी तर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 88 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती