महिला सशक्तीकरणासाठी अभिनव उपक्रमांना प्रोत्साहन द्या - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 















‘मेळघाट हाट’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण;

महिला सशक्तीकरणासाठी अभिनव उपक्रमांना प्रोत्साहन द्या

- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

      अमरावती, दि. 4 (जिमाका):  मेळघाट क्षेत्रातील स्वयं सहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनाला ‘मेळघाट हाट’ विक्री केंद्राच्या माध्यमातून उत्पादित वस्तू व साहित्याला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा अभिनव उपक्रमांना सर्व स्तरावरून प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी येथे केले.

            जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सायन्सकोर हायस्कुलच्या प्रांगणात महिला बचत गटांचे उत्पादन विक्री केंद्राचे उद्धाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे आदी यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातील उत्पादित साहित्याला हक्काचे विक्री केंद्र मिळाले आहे. या मॉलच्या माध्यमातून उत्पादित वस्तू थेट ग्राहकांना विक्री करुन बचत गटातील महिलांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना वनौषधी, बांबूंपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, जंगली मेवा, मध यासारख्या वस्तूंची खरेदी करता येईल. आदिवासी महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन आदिवासी क्षेत्रात जास्तीत-जास्त बचत गटांचे जाळे निर्माण करावे. महिलांची कला-कौशल्ये तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन वाढवून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासनासोबतच स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            विक्रीसाठी आणलेल्या साहित्यांना योग्य भाव मिळण्यासाठी विक्री साहित्याचे उत्तम मार्केटिंग, पॅकिंग व ब्रँडिंग करणे आवश्यक आहे. यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षित करावे. उत्पादित मालांना राज्यसह देशात बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येईल. मेळघाट क्षेत्रातील महिला बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यकतेनुसार कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिली.

 

            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंडा यांनी प्रास्ताविकेत मेळघाट हाटबाबत माहिती दिली. मेळघाटातील धारणी तसेच चिखलदरा तालुक्यातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी मेळघाट हाट विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे एकाच छताखाली मेळघाटातील उत्पादित केलेल्या 47 प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रथम टप्प्यात एकूण 60 स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनाचा समावेश करण्यात आला आहे. त्यात बांबूपासून निर्मित विविध उत्पादनांसह तृणधान्यांमध्ये सावा, कुटकी, ज्वारी, बाजरी तसेच कडधान्य, गहू, लाल तांदुळ, तूर दाळ, विविध प्रकारची लोणची, चिखलदऱ्यात उत्पादित होणारी प्रसिध्द कॉफी, मध, तूप, गृहशोभेच्या वस्तू, आरोग्याच्या दृष्टिकोनातून पौष्टिक खाद्यान्ने असे विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. येथे गोदाम, पॅकेजिंग, लेबलिंग युनिटसह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या मॉल विक्री केंद्राचे स्वरूप देण्यात आले आहे.

            कार्यक्रमाची सुरुवातीला आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर मेळघाट हाट उद्घाटनाच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी मेळघाट हाट मॉलमधील विक्री साहित्याची पाहणी करून याबाबत महिला बचत गटांच्या महिलांकडून माहिती जाणून घेतली. तसेच विविध वस्तूंची खरेदीही केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार शिप्रा मानकर यांनी मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती