प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती, दि. 11 (जिमाका) : औजारे व साधने यांचा वापर करुन तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपारीक कारागिर आणि हस्तकलेच्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्यांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगिण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना मंजूर केली आहे. या योजनेचा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच योजनेच्या लाभापासुन कोणीही पारंपारिक कारागिर वंचित राहु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सरपंच व नगरपरिषद कर्मचारी यांना केले.
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कार्यालय नागपुर आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ अमरावती यांच्या सयुक्त विद्यमाने स्थानिक बचत भवन येथे आयोजित पी एम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतंर्गत जनजागृती कार्यक्रमात श्री. कटियार बोलत होते. यावेळी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कार्यालयाचे राहुलकुमार मिश्रा, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. खरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रदीप चेचर, कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर आदी उपस्थित होते.
श्री. कटियार म्हणाले की, योजनेअंतर्गत 18 पारंपारिक उद्योगाचा समावेश करण्यात आला आहे. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये सरपंचाची महत्वाची भुमिका आहे. त्यांनी आपआपल्या गावांतील पारंपारिक कारागिरांपर्यंत योजनेची माहिती पोहचवुन त्यांना या योजनेअंतर्गत नोंदणी करण्याकरीता प्रोत्साहीत करावे. तसेच सरपंच यांनी तातडीने कारागीराची पडताळणी करुन सर्व अर्ज पुढील टप्पात पाठवावे, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तवीक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी केले. तर सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कार्यालयाचे श्री. खरे यांनी पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे सादरीकरण केले. तसेच सहाय्यक आयुक्त बारस्कर व पंकजकुमार जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
पारंपारीक कारागिर यांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे, त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी कौशल्य वृध्दी प्रदान करणे, व्यवसायासंबंधित आणि योग्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणे, चांगल्या आणि आधुनिक साधनांसाठी सहाय्य प्रदान करणे, विनातारण, सवलतीच्या व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध करुन देणे, डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे, ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी एक व्यासपीठ प्रदान करणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.
योजनेमधून नोंदणीकृत कारागिरांना मिळणारे लाभ
कौशल्य पडताळणी नंतर 5 ते 7 दिवस मुलभूत प्रशिक्षण, इच्छुक उमेदवार 15दिवस प्रगत प्रशिक्षण, प्रशिक्षण विद्यावेतन दररोज 500 रुपये, टूलकिट प्रोत्साहन 15 हजार रुपये अनुदान, तारणमुक्त व्यवसायिकता विकास कर्ज 1 लक्ष रुपये आणि 2 लक्ष रुपये, सवलतीचा व्याजदर एनएसएनईव्दारे 8 टक्के व्याज सवलत मर्यादेसह लाभार्थीकडून 5 टक्के व्याज, या कर्जासाठी क्रेडीट गॅरंटी फी केंद्र शासन उचलेल, डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन जास्तीत-जास्त 100 व्यवहारांसाठी प्रति व्यवहार 1 रुपये, विपणन समर्थन नॅशनल कमिटी फॉर मार्केटिंग गुणवत्ता प्रमाणपत्र, ब्रँडींग आणि प्रमोशन, ई-कॉमर्स लंकेज, व्यापार मेळावे जाहिरात, प्रसिध्दी आणि इतर विपणन यासारख्या सेवा प्रदान करेल.
योजनेसाठी पात्र लाभार्थी
असंघटित क्षेत्रात स्वयंरोजगार तत्त्वावर अवजारांची काम करणारे कारागीर, 18 कुटुंब आधारित पारंपारीक व्यवसायांपैकी एका व्यवसायात गुंतलेला कारागीर, नोंदणीच्या तारखेस लाभार्थ्याचे किमान वय 18 वर्षे असावे. या योजनेंतर्गत नोंदणी असलेली व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
0000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment