मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीस प्रारंभ प्रगणकाला सहकार्य करा; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

 


मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीस प्रारंभ

प्रगणकाला सहकार्य करा; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

 

          अमरावती, दि. 22 : राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी सर्वेक्षणाचे काम 23 ते 31 जानेवारीदरम्यान करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी येणाऱ्या प्रगणकाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. 

     राज्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचे हे काम 23 ते 31 जानेवारी या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य मागासवर्ग आयोगाने दिल्या आहेत.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वेक्षणाबाबत नागरिकांना माहिती व्हावी तसेच सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकाला प्रत्येक घरातून अचूक माहिती दयावी, असे आवाहन केले आहे. मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तहसिलदार यांच्या नियंत्रणाखाली प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. हे 23 ते 31 जानेवारी या कालावधीत सर्वेक्षण करणार आहेत. तरी नागरिकांनी सर्वेक्षण कालावधीत घरी उपस्थित राहून सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकाला सहकार्य करावे , असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

          मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे( निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा, आणि कुणबीच्या नोंदी शोधण्याकरिता सप्टेंबर 2023 मध्ये शासनाने समिती तयार केली. या समितीने महाराष्ट्रभर कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याकरिता विशिष्ट कार्यक्रम  राबवून त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात नोंदी शोधण्याची कार्य अमरावती जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर आणि विविध विभागांच्या माध्यमातून केले. या शोध मोहिमेतून जिल्हाभरात 7 लाखांपेक्षा जास्त कुणबी नोंदी शोधण्यात आल्या. जिल्हा प्रशासनातर्फे या सर्व नोंदी amravati.gov.in या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

       जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपणास आवश्यक असणाऱ्या कुणबी नोंदी या संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त करून घ्याव्यात व कुणबी प्रमाणपत्रासाठी सक्षम प्राधिकारी तथा आपले उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती