उत्कृष्ट ग्रंथालय, कार्यकर्ता व सेवकांनी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

उत्कृष्ट ग्रंथालय, कार्यकर्ता व सेवकांनी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 19 (जिमाका): ग्रंथालय संचालनालयातर्फे उत्कृष्ट ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसेच ग्रंथालय कार्यकर्ता व सेवकांना डॉ. एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी दि. 9 फेब्रुवारीपूर्वी  अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लक्ष रूपये, 75 हजार, 50 हजार व 25 हजार रूपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालयसेवक यांना प्रत्येकी 50 हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र, तसेच प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रूपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

 

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करून द्याव्यात आणि वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना हा पुरस्कार दिला जातो. इच्छूकांनी दि. 9 फेब्रुवारीपूर्वी विहित नमुन्यात तीन प्रतींत अर्ज जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती