स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान; पंधरवाडा जनजागृतीकरीता सर्व विभागांने प्रयत्न करावे - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान; पंधरवाडा जनजागृतीकरीता सर्व विभागांने प्रयत्न करावे

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 



अमरावती, दि. 19 (जिमाका): केंद्रीय कुष्ठरोग विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या पंधरवाड्यात ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवाडा कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कुष्ठरोग जनजागृतीकरीता आरोग्य विभागासोबत समन्वय साधून सर्व विभागांनी संयुक्तीक प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा आज पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले, आरोग्य सेवा कुष्ठरोग सहाय्यक संचालक रमेश बनसोड, स्वयंसेवी संस्थेचे सुरेश धोंडगे,  पर्यवेक्षक डि. एस. गडलींग, गजानन पन्हाळे, अविनाश इंगळे, रितेश ठाकरे, वैद्यकीय अधिकारी पूनम मोहकार, विनिती नवरे आदी उपस्थित होते.

 

सौरभ कटियार म्हणाले की, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचे ध्येय व उदिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करावी. अभियान कालावधीमध्ये विविध उपक्रम राबवावे. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेचे आयोजन करुन व्याख्यान, कुष्ठरोग निर्मुलन प्रतिज्ञा, कुष्ठरोगाबाबत प्रश्नोत्तरे, कुष्ठबाधित व्यक्तींचा सत्कार  इत्यादी उपक्रम राबवावे. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये कुष्ठरोग निर्मुलन प्रतिज्ञाचे वाचन करावे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यामिक शाळांमध्ये अभियान कालावधीमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पथनाटय, रॅली तसेच जिल्हास्तरीय मॅरेथॉन, आरोग्य मेळावे असे जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावे.  कुष्ठरोग जनजागृतीसाठी आरोग्य विभागासोबत समन्वय साधून सर्व विभागांनी संयुक्तीक प्रयत्न करावे, असे निर्देश यावेळी दिले.

 

कुष्ठरुग्ण शोध मोहीम दि.20 नोव्हेंबर ते 6डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये अमरावती जिल्ह्यातील ग्रामिण, शहर व महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात आली. या अभियानामध्ये जिल्हयातील 328 नविन रुग्णांचे निदान करुन औषधोपचार देण्यात आले. या अभियानामध्ये महाराष्ट्र राज्यातून अमरावती जिल्ह्याचा रुग्ण शोध कार्यामध्ये व्दितीय स्थान प्राप्त झाल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हास्तरीय अधिकारी तसेच कर्मचारी यांचा सत्कार केला.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती