उपमुख्यमंत्री यांनी ‘मेळघाट हाट’ची केली पाहणी;

















 

उपमुख्यमंत्री यांनी ‘मेळघाट हाट’ची केली पाहणी;

आदिवासी महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळाले प्लॅटफॉर्म

                                       -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

अमरावती, दि. 22 (जिमाका):  मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री व विपणनासाठी 'मेळघाट हाट'चा प्लॅटफॉर्म प्रशासनाव्दारे उपलब्ध करुन दिला आहे. या विक्री केंद्राचा आदिवासी क्षेत्रातील महिलांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

 

            येथील सायन्सकोर हायस्कुलच्या प्रांगणात महिला बचत गटांचे उत्पादन विक्री केंद्राच्या भेटी दरम्यान श्री. फडणवीस बोलत होते.  यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देवीदास पवार, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

            उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातील उत्पादित साहित्याला हक्काचे विक्री केंद्र मिळाले असून यामुळे बचतगटातील महिलांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. विक्रीसाठी आणलेल्या साहित्यांना योग्य भाव मिळण्यासाठी त्यांचे उत्तम मार्केटिंग, पॅकिंग व ब्रँडिंग करावे. प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमामुळे महिला महिला सक्षमीकरणासह आदिवासी महिला बचत गटांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.

 

जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मेळघाटात क्षेत्रातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी मेळघाट हाट विक्री केंद्र सुरू केले आहे. या विक्रीकेंद्रामध्ये मेळघाटातील उत्पादित केलेल्या 47 प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रथम टप्प्यात एकूण 60 स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनाचा समावेश करण्यात आला आहे. त्यात बांबूपासून निर्मित विविध उत्पादनांसह तृणधान्यांमध्ये सावा, कुटकी, ज्वारी, बाजरी तसेच कडधान्य, गहू, लाल तांदुळ, तूर दाळ, विविध प्रकारची लोणची, चिखलदऱ्यात उत्पादित होणारी प्रसिध्द कॉफी, मध, तूप, गृहशोभेच्या वस्तू, आरोग्याच्या दृष्टिकोनातून पौष्टिक खाद्यान्ने असे विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. येथे गोदाम, पॅकेजिंग, लेबलिंग युनिटसह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या मॉल विक्री केंद्राचे स्वरूप देण्यात आले आहे.

 

            कार्यक्रमाची सुरुवातीला आदिवासी नृत्य सादर करुन अतिथींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री. फडणवीस यांनी मेळघाट हाट मॉलमधील विक्री साहित्याची पाहणी करून माहिती जाणून घेतली.

 

हनुमान गढीला उपमुख्यमंत्री यांनी दिली भेट

 

            हनुमान गढी येथे हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्टव्दारा आयोजित कारसेवक सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. या समारंभात राम मंदिर निर्माण कार्यात योगदान दिलेल्या जिल्ह्यातील कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. फडणवीस यांचेही कारसेवक म्हणून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी सत्कार केला. त्यानंतर येथे उभारण्यात येणाऱ्या 111 फुट हनुमान पुतळ्याच्या चरणाचे पुजन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

 

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाविकांसाठी तयार करण्यात आलेल्या 11 लाख लाडूच्या प्रसादाचे उद्घाटन श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  खासदार डॉ. अनिल बोंडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोंखडे आदी यावेळी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती