भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीच्या विशेष शिबिरांमध्ये 554 जणांची मतदार नोंदणी नवमतदारांचा टक्का वाढला - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 




भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीच्या

विशेष शिबिरांमध्ये 554 जणांची मतदार नोंदणी

 

नवमतदारांचा टक्का वाढला

- जिल्हाधिकारी  सौरभ कटियार

 

             अमरावती, दि. 23 (जिमाका): यंदा जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावती करणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहिम राबविण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबविण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला, अशी माहिती जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिली.

        अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनानिमित्ताने जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री. कटियार यांनी ही माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यावेळी उपस्थित होते.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुध्दीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणुक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जातो. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये व सर्व मतदान केंद्रांवर प्रारूप यादी प्रकाशित करून 2024 च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. हा कार्यक्रम 27 ऑक्टोबर 2023 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत राबविला गेला. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2023 च्या प्रारूप मतदार यादीत 54 हजार 19 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 47 हजार 357 मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादी 6 हजार 662 मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या 23 लक्ष 99 हजार 197 इतकी झालेली आहे. त्यानुसार 1 हजार 147 पुरूष मतदारांची तर 5 हजार 511 स्त्री मतदारांची आणि 4 तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झालेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री –पुरुष गुणोत्तर 940 वरून 943 एवढे झाले असल्याची माहिती श्री. कटियार यांनी यावेळी दिली.

        या पुनरीक्षण कार्याक्रमाध्ये 18 ते 19 या वयोगटामध्ये 13 हजार 266 मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच 20 ते 29 या वयोगटात 18 हजार 329 मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारूप यादीत 18 ते 19 या वयोगटाची मतदार संख्या 5 हजार 452 (0.16 टक्के) होती. ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत 18 हजार 718 (0. 54 टक्के) इतकी झालेली आहे. तर 20 ते 29 वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या 3 लक्ष 95 हजार 21 (11.40 टक्के) होती. ती अंतिम यादीत 4 लक्ष 13 हजार 350 (11.93 टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबविलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येते.

             येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट 2023 या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहिम राबविण्यात आली होती. या सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली. त्यानुसार 77 हजार 619 मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये 17 हजार 792 एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज) असल्याचे निदर्शनास आले. त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत 7 हजार 848 मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे. तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज) 6 हजार 794 मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून 2 हजार 613 मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन स्पीड पोस्टाने नोटिस पाठवून तसेच पूर्ण तपासणी करुन कायदेशीररित्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.

       मतदार यादी जितकी सर्व समावेशक तितकी वंचित समाजघटक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमाचे खास वैशिष्टये म्हणजे भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये मतदार नोंदणीबरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला यांचेही या जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले. धामणगाव रेल्वे 36,   बडनेरा 37, अमरावती 38, तिवसा 39, दर्यापूर 40, अचलपूर 42 या मतदार संघात शिबिरे घेण्यात आली होती. त्यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या एकूण 554 लोकांची मतदार नोंदणी करण्यात आली.

दिव्यांग मतदारांना ये-जा करण्याच्यादृष्टिने 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर राहणार आहेत. तसेच शहरातील लोकांची व्यग्र जीवनशैली, मतदानाबद्दल अनास्थेमुळे मोठ्या शहरांमध्ये मतदानाची  टक्केवारी कमी असते. शहरी मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी 10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रूवारी 2024 पर्यंत ईव्हीएम, व्हीव्हीपीएटी बाबत विशेष जनजागृती मोहीम कार्यक्रम राबविणे सुरू आहे.

       यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या बहु-अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्वनोंदणी करता आली. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व नोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे.

दि. 23 जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी ‘मतदाता सेवा पोर्टल’ या संकेतस्थळावर https://electoralsearch.eci.gov.in/ जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का, हे पाहावे. सोबतच मतदान केंद्रही तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही, तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा तसेच सर्व राजकीय पक्षांनीही आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या (बीएलए) नियुक्त्या करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

       नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच ‘मतदाता सेवा पोर्टल’ आणि ‘वोटर हेल्पलाइन ॲप’ यावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे, अशी माहिती  उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शिंदे यांनी दिली.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती