प्रजासत्ताक दिन सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा

 



प्रजासत्ताक दिन सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा;

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करा

-         निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.विवेक घोडके

 

अमरावती, दि. 05 (जिमाका): भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ 26 जानेवारी 2024 रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सकाळी 9. 15 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी आज येथे दिले.

        प्रजासत्ताक दिनाचा 74 वा वर्धापन सोहळा पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बांधकाम विभागाचे उपअभियंता तुषार काळे, तहसिलदार विजय लोखंडे, प्रशांत पडघम तसेच  महसूल, पोलीस, महापालिका,  सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, माहिती कार्यालय आदी कार्यालयांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. घोडके म्हणाले की, मुख्य ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या हस्ते होईल.  मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळी रंगरंगोटी, कुंड्या ठेवणे, पताका लावणे, अतिथी व उपस्थितांची बैठक व्यवस्था, आवश्यक स्वयंसेवक, ध्वनीयंत्रणा आदी व्यवस्था नियोजनबध्द पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत.  महापालिकेकडून स्वच्छता, पेयजल सुविधा, मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांना खाऊवाटप आदी व्यवस्था पुरविण्यात यावी. तसेच ध्वजवंदन समितीने ध्वजस्तंभ, राष्ट्रध्वज, ध्वजाला मानवंदना, पोलीस पथक,  बँड पथकाची नियुक्ती आदी कामे लवकर पूर्ण करुन घ्यावीत.

प्रजासत्ताक दिनी अधिकाधिक लोकांना या समारंभास उपस्थित राहाता यावे, यासाठी यादिवशी सकाळी 8.30 ते सकाळी 10 या वेळेत इतर कार्यालय, संस्थांनी ध्वजारोहण किंवा शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करू नये. असे समारंभ सकाळी 8.30 च्या पूर्वी किंवा सकाळी 10 नंतर आयोजित करावेत, अशा सूचना श्री. घोडके यांनी दिल्या.

सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम

प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 7 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली  आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कार्यक्रम यथोचितरीत्या साजरा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. घोडके यांनी दिले. कार्यक्रमापूर्वी रंगीत तालीम 25 जानेवारीला 2024 रोजी सकाळी 9 वाजता जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती