राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा; सुदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 






राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा; सुदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 25 (जिमाका): आगामी निवडणुकीत मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा. सुदृढ लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत नवमतदार व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

 

14 व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त छत्रपती शिवाजी सभागृह, मोर्शी रोड अमरावती येथे मतदार जनजागृती व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, पोलीस अधीक्षक विशाल आनंद शिंगुरी, मनपा आयुक्त देवीदास पवार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपायुक्त संजय पवार, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे निबंधक तुषार देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, तहसिलदार विजय लोंखडे आदी यावेळी उपस्थित होते.

 

श्री. कटियार म्हणाले की, निवडणूकीत घटत असलेले मतदानाचे प्रमाण चिंतेचा विषय असून मतदान शतप्रतिशत व्‍हावे यासाठी प्रशासनाव्दारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत मतदार व नवमतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा. तसेच नवमतदारांना मतदानाचा हक्‍कासोबत त्‍यांना त्‍यांच्‍या कर्तव्‍याप्रती जाणीव निर्माण व्‍हावी, यासाठी महाविद्यालयीन स्‍तरांवर प्रशासनाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदानाच्‍या दिवशी अनेक नागरिक मतदानाबाबत विविध कारणांनी अनास्‍था दाखवून मतदान करीत नाहीत. त्‍या मतदारांना मतदानाविषयी महत्‍त्‍व पटवून दिले पाहिजे. मतदारांनी कोणत्‍याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचा हक्‍क निर्धास्‍तपणे बजवावा, असेही ते यावेळी म्हणाले.

 

मतदार जनजागृती रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

 

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज शहरातून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून इर्विन चौक येथून मार्गस्थ करण्यात आले. या रॅलीमध्ये मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन, मतदार जनजागृती रथ, बॅनर व विद्यार्थ्यांव्दारे मतदार जनजागृतीपर घोषणा देत रॅली मोर्शी रोड मार्गे छत्रपती शिवाजी सभागृह येथे पोहचली. या रॅलीमध्ये शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व नवमतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थिताना मतदार दिनाची शपथ देण्यात आली.

 

मतदार नोंदणीत उत्कृष्ट काम करणारे प्रत्येक विधानसभा मतदार संघातून पर्यवेक्षक, मतदान केंद्र अधिकारी तसेच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, जेष्ठ मतदार, उत्कृष्ट पत्रकार, भटक्या विमुक्त जमातीचे समाजसेवक यांचे सत्कार यावेळी करण्यात आले. तसेच 18 वर्षावरील मतदान नोंदणी केलेल्या युवक-युवतींना मान्यवरांच्या हस्ते मतदाराचे ओळखपत्र वितरित करण्यात आले.

 

उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी मतदानाचे महत्‍त्व याबाबत उपस्थिताना प्रास्ताविकेतून माहिती दिली. मतदार नोंदणी ही निरंतर प्रक्रिया असून नवीन मतदारांची नोंदणी निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत सुरु आहे. याचा लाभ नवमतदारांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे संचालन शिप्रा मानकर यांनी तर आभार उपजिल्हाधिकारी रणजित भोसले यांनी मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती