अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी महाराजस्व अभियान

 

















अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी महाराजस्व अभियान

* अभियानात 50 हून अधिक शासकीय योजनांच्या स्टॉलचा समावेश

* विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व ई-रिक्षाचे वितरण

 

            अमरावती, दि. 12 (जिमाका): विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून जनसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराजस्व अभियान हाती घेतले आहे. एकही नागरिक शासनाच्या योजना, लाभापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनामार्फत या उपक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी आज येथे केले.

 

          स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्व शासकीय यंत्रणाकडून जिल्हास्तरीय राजस्व अभियान संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आले होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार रवी राणा,  मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी नरेश अकुनूरी, मनपा आयुक्त देवीदास पवार, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, रवींद्र जोगी, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, वेणू मिना, तहसिलदार विजय लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

 

          खासदार श्रीमती नवनीत राणा म्हणाल्या की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी शासनाकडून थेट संवाद साधून अडी-अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक विकासकामांना गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयाने कार्य सुरु आहे. राज्याच्या विकासदरात जिल्ह्याचे योगदान वाढवून  उद्योग व पर्यटनाला चालना देण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीबांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील अनेक विकास कामे पुर्णत्वास जात आहेत. पीएम मित्रा टेक्सटाईल प्रकल्पामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. शासन व प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हा उपक्रम राबवित आहे. लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असेही त्या यावेळी म्हणाल्या.  

         

          खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी 'शासन आपल्या दारी' उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी योजनेचा लाभ, प्रमाणपत्र व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनेंतर्गत गंभीर आजारासाठी मोफत उपचार केले जात असून त्यांचा लाभ गरीबांना मिळत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्त्वात भारत नावलौकिक मिळवत असून लवकरच आपला देश विकसित देशाच्या रांगेत उभा राहिल. महाराजस्व अभियानामध्ये विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले असून त्याचा लाभ  नागरिकांने घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

          आमदार प्रवीण पोटे पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमुळे लघु उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले असून त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी मदत होत आहे. आयुष्मान योजनेमुळे गोरगरीबांना वैद्यकीय सुविधा मोफत मिळत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे शासकीय योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत आहे. सर्वसामान्यांचा विकास हा उपक्रम उद्देश असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 

          आमदार रवी राणा म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरीबांना घर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीआर कार्ड आवश्यक आहे. राजस्व अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पीआर कार्डचे वितरण करण्यात येत आहे. यामुळे गरीबांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. महाराजस्व अभियानाच्या एका छताखाली शासकीय इतर योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना दिला जात आहे. शासकीय योजनांची माहिती व त्याचा  लाभ गरजूंपर्यंत पोहचावा यासाठी असे उपक्रम शासनामार्फत निरंतर राबविण्यात यावे. जेणेकरुन प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल.

 

          जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी शासनाकडून 'महाराजस्व अभियान' राबविले जात आहे. सर्वसामान्यांची प्रलंबित कामे त्याद्वारे तात्काळ निकाली काढण्यात येत आहेत. या अभियानामध्ये महसूल विभागासोबतच सर्व शासकीय यंत्रणेचा समावेश असून शासनाच्या विविध योजना, लाभ व लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. हे अभियान ग्रामीण भागात 31 मार्चपर्यंत राबविण्यात येणार आहे. याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

          राजस्व अभियानामध्ये प्रातिनिधिक स्वरुपात ई-रिक्षा, व्हिल चेअर्स व प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानामध्ये आरोग्य विभाग, समाजकल्याण, महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन, आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा परिषद, अन्न व नागरी पुरवठा, भुमिअभिलेख, दिव्यांग कल्याण विभाग, निवडणुक विभाग अशा विविध विभागाचे 50 स्टॉल लावण्यात आले होते.

00000

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती