नागपूर-अमरावती विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनांचा (सर्वसाधारण) उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी घेतला ऑनलाईन आढावा

 





मेळघाट येथे इको टुरिझम निर्माण करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

नागपूर-अमरावती विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनांचा (सर्वसाधारण)

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी घेतला ऑनलाईन आढावा

 

* अमरावती जिल्ह्यासाठी 371 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मंजूरी; दोनशे कोटींची अतिरिक्त मागणी

 

               * धारणी, चिखलदरा या आकांक्षित तालुक्यांना अधिकचा निधी

 

अमरावती, दि. 8 (जिमाका): महाराष्ट्राच्या आर्थिक विकासदरामध्ये अमरावती जिल्ह्याची टक्केवारी अधिक वाढावी यादृष्टीने येथील विकास कामांना गतीने चालना द्यावी. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मेळघाट येथे इको टुरिझम निर्माण करा. यातून जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री (नियोजन) अजित पवार यांनी आज केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी विदर्भातील नागपूर व अमरावती विभागातील अकरा‍ जिल्ह्यांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. या बैठकीला ऑनलाईन पध्दतीने राज्याचे उच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय उपस्थित होते.  तसेच अमरावती जिल्हा नियोजन भवन येथून खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार देवेंद्र भुयार, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधीच्या खर्चाची जबाबदारी प्रशासकीय विभागांकडे असून येणाऱ्या निवडणूका व आचारसंहिता लक्षात घेता तातडीने निधी विकास कामांवर खर्च करावा. निधी वेळच्यावेळी खर्च करतानाच विकास कामे दर्जेदारपणे पूर्ण करावीत. नागपूरच्या धर्तीवर नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत मेळघाट, चिखलदरा या भागामध्ये इको टुरिझम संकल्पना विकसित करा. यासाठी त्वरित कृती आराखडा तयार करा. चिखलदरा येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्काय वॉकची निर्मिती करण्यात येत आहे. या प्रकल्पाला समांतर विकास प्रकल्प येथे निर्माण करा. येथील पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा विकसित करा. येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकास कामांवर भर द्या. तसेच येथे ॲडव्हेंचर टुरिझम निर्माण व्हावे, या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. यासाठी लोकप्रतिनीधींनी पाठपुरावा करावा. धारणी, चिखलदरा या आकांक्षित तालुक्याच्या निर्देशांकात वाढ करण्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री (नियोजन) अजित पवार यांनी यावेळी दिली. अमरावती विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नागपूर येथील इको टुरिझम संकल्पनेची प्रत्यक्ष पाहणी करुन आराखडा सादर करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने 371 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मंजूरी दिली आहे. जिल्ह्यात विविध योजना राबविण्यासाठी दोनशे कोटींची अतिरिक्त मागणी यावेळी करण्यात आली. सन 2024-25 या आर्थिक वर्षात हा निधी खर्च करण्यात येणार आहे. यंदा अधिक निधी वाढवून मिळावा, अशी मागणी लोकप्रतिनीधींकडून करण्यात आली. जिल्ह्यांची लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रावर आधारीत तयार करण्यात आलेल्या सूत्रानुसार निधीचे वितरण करण्यात येईल. तथापि गतवर्षी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निधीपेक्षा यंदा अधिकचा निधी देण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड करु नये, प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले, अमरावती जिल्हा भौगोलिकदृष्या मोठा आहे. येथील उर्जा विभागामार्फत येत्या काळात 22 गावांना लाभ देण्यात येणार आहे. मेळघाट क्षेत्रातील धारणी, चिखलदरा तालुक्यातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी अमरावती शहरात ‘मेळघाट हाट’ विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामुळे बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे. तसेच मेळघाटातील कुपोषणावर मात करण्यासाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येत असून महिला व बाल विकास विभागामार्फत उपक्रमही राबविण्यात येत आहेत. मेळघाटातील इको टुरिझम विकसित करुन येथील व्याघ्र प्रकल्पाला चालना देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चिखलदरा व धारणी क्षेत्रात इको टुरिझम विकसित करावे. येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जंगल सफारी सुरु करावी. जिल्ह्यातील मुलभूत विकास कामांना आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा. अमरावती शहरातील स्त्री रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून ते लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली.

आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेत वाढीव निधीची मागणी केली. महानगरपालिकेच्या शाळेच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत. त्यांच्या पुर्नबांधणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय यांना वाढीव निधी उपलब्ध करुन द्यावा. विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या (व्हीएमव्ही) शिकस्त इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करुन देण्यात यावी. तसेच नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी शासकीय रुग्णालयाच्या परिसरात त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी धर्मशाळेची स्थापना करण्यात यावी, विभागीय क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्ह्यातील महेंद्री जंगल सफारी येथे पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी निधीची मागणी केली. तसेच महानुभावांची काशी रिध्दपूर येथे श्रध्देने दरवर्षी जगभरातून पर्यटक येतात. येथील पर्यटकांना आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

0000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती