Tuesday, March 31, 2020

उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 3 महिने विनामूल्य गॅस सिलेंडर


एप्रिल ते जून पर्यंतच्या कालावधीत प्रत्यक्ष लाभ
जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार नागरिकांना मिळणार लाभ
अमरावती, दि. 31 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाव्दारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून या कालावधीत विनामूल्य गॅस रिफील देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार नागरिकांना लाभ मिळणार आहे.
एप्रिल ते जून या कालावधीत गॅस सिलेंडर रिफील करण्यासाठी लागणारा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अग्रिम स्वरुपात जमा करण्यात येत आहे.  
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने विशेष वित्तीय पॅकेजची घोषणा केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करुन या संकटाच्या स्थितीत आपले योगदान दिले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळात देशातील विविध तेल कंपन्यांनी घरोघर गॅस सिलेंडर पोहोचविण्यासाठी नियोजन केले आहे. कंपन्यांकडे गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा आहे. त्यानुसार त्यांच्याकडून वेळोवेळी ग्राहकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जाईल.
ग्राहकांनी घरीच राहावे. त्यांनी गॅस वितरण कंपनीत न येता, त्यांना घरपोच गॅस सिलेंडर पुरविण्यासंबंधीच्या सूचना गॅस कंपन्यांकडून एसएमएस संदेश व सोशल मिडियातून देण्यात येत आहेत. एलपीजी गॅस सिलेंडर हे अत्यावश्यक वस्तूमध्ये मोडत असल्यामुळे संचारबंदीमधून सूट देण्यात आली आहे. ग्राहकांना सुरळीत गॅस सिलेंडरचा पुरवठा व्हावा, यासाठी गॅस वितरक कर्मचारी, गोडाऊन किपर, मॅकेनिक आणि डिलीव्हरी बॉय आदींमार्फत पूर्ण तत्परतेने सेवा पुरविण्यासाठी काम करीत आहेत.
गॅस रिफिल वितरणाचे काम करताना वितरक, वाहतूकदार, कंत्राटदार आणि कर्मचारी आदींचीही सुरक्षितता राखण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. दुर्देवाने कुठलीही आपत्ती घडल्यास गॅस कंपनीच्या सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या जीवन सुरक्षेसाठी पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूद शासनाने केली आहे.  .
नागरिकांनी कोव्हिड- 19 विरुध्दच्या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन गरीबांना व गरजूंना सामाजिकदृष्ट्या मदत करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...