जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन व्यावसायिकांची बैठक




                                    बाहेरून येणा-या प्रवाशांबाबत वेळीच माहिती द्यावी
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती, दि. 13 :  कोरोना विषाणूच्या देशातील प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणा-या प्रवाशांबाबत प्रशासनाला वेळीच माहिती द्यावी. दक्षतेसंबंधी शासनाने जारी केलेल्या प्रत्येक बाबीचे पालन व्हावे, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, टुर्स अँड ट्रॅव्हल्स संघटनेचे भूषण कोल्हे, दिनेश अग्रवाल, महेश कोल्हे, सचिन निचळे, संजय हेमनानी, उमेश उमप, केदार मून, चेतन हरणे, प्रकाश मांगरूळकर, श्याम अग्रवाल, हरमेश सुराणा, नंदू शिरभाते आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, बाहेरून येणा-या प्रत्येक व्यक्तीची माहिती  प्रशासनाला द्यावी. त्यांची तपासणी आवश्यक आहे. संशयित आढळल्यास त्यांना देखरेखीत ठेवण्यासाठी तपोवन, वलगाव येथे आयसोलेटेड क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तिथे आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसाठी खबरदारी घेणे आवश्यक असून, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
जगभरात कोरोनाबाबत निर्माण झालेली स्थिती पाहता पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. प्रवाशांकडून बुकिंग रद्द होत आहेत. मात्र, अशावेळी काही देशांतील पर्यटन व प्रवासासाठीच्या बुकिंग खर्च परतावा मिळू शकत नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून पाठपुरावा व्हावा, असे निवेदन संघटनेतर्फे जिल्हाधिका-यांना देण्यात आले. याबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले. आपत्ती व्यवस्थापनासाठी संघटनेकडून प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी संघटनेच्या वतीने सदस्यांनी सांगितले. भविष्यात मेळघाटातील पर्यटन विकासाच्या शक्यतांबाबतही यावेळी चर्चा झाली.
                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती