Sunday, March 29, 2020

संशयित आढळल्यास तत्काळ तपासणी; अद्यापपर्यंत एकही पॉझिटिव्ह अहवाल नाही


 अफवांवर विश्वास ठेवू नका
जिल्हाधिका-यांचे आवाहन
अमरावती, दि. 29 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना होत आहेत. जिल्ह्यात कुणाही नागरिकात लक्षणे आढळल्यास तत्काळ त्यांचे थ्रोट स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. तथापि, अद्यापपर्यंत तरी कुणाचाही पॉझिटिव्ह अहवाल आला नाही. त्यामुळे कुठल्याही अफवेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.
मेरठ येथील एक संशयित व्यक्ती अमरावतीत मुक्कामी राहिली होती.  त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नातेवाईक, परिचितांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्यात आजाराची लक्षणे आढळली नाहीत. तरीही तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे, हैदराबाद येथून आलेल्या एका व्यक्तीने ज्या फ्लाईटमध्ये प्रवास केला, त्यातील सहप्रवाश्यांमध्ये एक रुग्ण आढळल्याचे नंतर निष्पन्न झाले. स्थानिक व्यक्तीत कुठलीही लक्षणे आढळली नाहीत. तथापि, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचा थ्रोट स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. चाचणी अहवाल आल्यानंतर त्याविषयी माहिती जाहीर केली जाईल. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये.  

शासनाकडून वेळोवेळी अधिकृत माहिती जाहीर करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत तरी जिल्ह्यात एकही कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी कुठल्याही चुकीच्या माहितीवर अथवा समाजमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या संदेशावर विश्वास ठेवू नये. तसेच नागरिकांनी स्वत्:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. बाहेर देशातून तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती संदर्भात नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
  
दरम्यान, जिल्हाधिका-यांनी आज विविध माध्यमांचे संपादक व प्रतिनिधींशी चर्चा करून सर्वांनी आपत्ती निवारणाच्या काळात चुकीची माहिती रोखण्यासाठी व अधिकृत माहिती प्रसारणासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.  ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर, नानक आहुजा, प्रदीप देशपांडे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, संपादक विलास मराठे, जयराम आहुजा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी संजय शेंडे, गिरीश शेरेकर यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
                                    000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...