प्रशासनाला सहकार्य करा


घाबरू नका, दक्षता घ्या

-         जिल्हाधिका-यांचे आवाहन

 

अमरावती, दि. 21 :  कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आरोग्य विभागासह विविध विभागांच्या यंत्रणा सुसज्ज व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.  या काळात नागरिकांनीही घाबरून न जाता योग्य ती दक्षता घ्यावी व साथरोग नियंत्रणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

जिल्ह्यात बाहेरून आलेल्या व्यक्तींची नियमित तपासणी करण्यात येत आहे. एस. टी., खासगी बस, रेल्वे प्रवाश्यांच्या तपासणीसह आंततराज्यीय सीमेवरही वाहन तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. परदेशातून आलेल्या तसेच अशा व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्यानुसार  होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्याशी सतत संपर्क केला जात आहे. विविध यंत्रणांकडून सातत्याने जनजागृतीही करण्यात येत आहे.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला असून, त्यानुषंगाने विविध निर्देश देण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तू विक्री वगळता खासगी दुकाने 25 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दी टाळण्यासाठी हे निर्णय घेतले आहेत. प्रतिबंधात्मक उपायांनीच या संसर्गावर मात करता येणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनीही घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार दक्षता घ्यावी. कुठलीही माहिती लपवू नये. स्वतःची, स्वतःच्या कुटूंबाची व जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी व साथरोग प्रसारास आळा घालण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.  

            शासनाकडून वेळोवेळी अधिकृत माहिती प्रसारित करण्यात येत आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सजग राहून खबरदारी घ्यावी. कुठलीही शंका असल्यास हेल्पलाईनला फोन करून माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. हेल्पलाईनसाठी जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्रमांक  1800 233 6396 व संवाद कक्षाचा (0721) 2661355 असा आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांक  (0721) 2663337, आपत्ती नियंत्रण कक्षाचा (0721) 2662025, अमरावती महापालिकेचा  8408816166, तर जिल्हा परिषदेचा (0721) 2662591, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचा (0721) 2665041, तर पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्षाचा (0721) 2551000 असा आहे.

 

राज्य नियंत्रण कक्षाचा (020) 26127394, एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष (020) 27290066 आणि टोल फ्री क्रमांक 104 हा आहे.

                                                            000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती