प्रवासी नागरिक व विस्थापितांना सुविधेसाठी संनियंत्रण अधिका-यांची नियुक्ती


अमरावती, दि. 30 : बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, पाणी, अन्नधान्य व भोजन व्यवस्था आणि वैद्यकीय देखभाल या सुविधा देण्यासाठी संनियंत्रण अधिका-यांची नेमणूक करण्यात आहे. त्याबाबत आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.
ग्रामीण क्षेत्रासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहायक अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी विकास मीना व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहायक अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना व मनपा उपायुक्त महेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेघर, विस्थापित झालेले कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्या निवारागृह, पाणी, अन्नधान्य व भोजनव्यवस्था व वैद्यकीय देखभाल या सुविधांबाबतची कार्यवाही करण्याबाबत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. व्यवस्थेसाठी जि. प., समाजकल्याण, आदिवासी विकास विभाग, मनपा समाजकल्याण आदींच्या शासकीय वसतिगृहाचे अधिग्रहण करावे. या वसतिगृहाच्या अधिक्षकांनी वसतिगृहात वीज, पाणी, बिछायत, स्वच्छता, सुरक्षा कर्मचारी, स्वयंपाकी असल्याची खातरजमा करावी. त्याशिवाय, स्वयंसेवी संस्थांद्वारे भोजन आदी व्यवस्थेबाबत आवाहन महापालिका व तहसीलदारांनी करावे. त्याचप्रमाणे, आवश्यक तिथे शिवभोजनच्या निकषांप्रमाणे धान्य निवारागृहात व्यवस्थेची कार्यवाही करावी.
मुख्य कार्यकारी अधिका-यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याशी समन्वय साधून योग्य कार्यवाही करावी. शासकीय वसतिगृहे अपुरी पडल्यास शासकीय शाळा घेण्यात याव्यात व ही सर्व कार्यवाही करत असताना सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छता या बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती