राज्य मराठी पत्रकार परिषदेचे एक दिवसीय संमेलन

















        समाजाच्या चौफेर प्रश्नांची जाण ठेवून सकारात्मक पत्रकारिता करावी
                                                                 -राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 1 : पत्रकार हा सदृढ समाज घडविण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावत असतो. पत्रकारांनी बातमीत वापरलेल्या एखाद्या द्विअर्थी शब्दामुळे त्याचे चांगले किंवा वाईट पडसाद समाज मनावर उमटत असतात. त्यामुळे पत्रकारांनी लेखन करतांना समाजाच्या चौफेर प्रश्नांची जाण ठेवून, परीणामांचे चिंतन करुन सकारात्मक पत्रकारिता करावी, असे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे सांगितले.
मध्यप्रदेशच्या बैतुल तालुक्यातील मुक्तागिरी या जैनांच्या तिर्थस्थळी राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे एक दिवसीय संमेलन आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक (ग्रामीण) हरीबालाजी एन., प्रतिदिन अखबारचे संपादक नानक आहुजा, परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे, जिल्हाध्यक्ष नितीन किल्लेकर, मुक्तागिरीचे संस्थाध्यक्ष अतुल कळमकर, नागपूर महाराष्ट्र टाईम्स चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी व पत्रकार बांधव आदी यावेळी उपस्थित होते.
 श्री. कडू म्हणाले की, परतवाडा पासून दहा किलोमिटरच्या अंतरावर असलेले मुक्तागिरी हे तिर्थक्षेत्र जैनांची काशी आहे तर यापासून थोड्या अंतरावर बहिरमबुवाचे दैवत आहे. दोन्ही देवस्थान लोकांची श्रध्दास्थाने आहेत. या परिसराचा विकास तसेच याठिकाणी पोहाचण्याच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार. त्यामुळे भाविकांना या तिर्थक्षेत्री पोहोचणे सोईचे होईल.
पत्रकार व पत्रकारिते संदर्भात बोलायचे झाले तर पत्रकारांच्या लेखणीतून राजकीय माणूस घडतो तसा बुडतो सुध्दा. सकारात्मक पत्रकारितेतून माणूस घडत असतो. बातमीचे दोन प्रकार आहेत एक विरुधार्थी तर दुसरी अनुकूलक. पत्रकारिता ही दुधारी तलवार आहे. या तलवारीच्या माध्यमातून पत्रकाराने समाजातील चौफेर प्रश्नांची मांडणी करुन ते सोडविण्यासाठी सकारात्मक लिखान करावे. त्यामुळेच वैचारिक व सदृढ समाजाची निर्मिती होऊ शकणार. जळगावातील तीन अपंग व्यक्ती पडलेल्या घरात वास्तव्य करीत असल्याची बातमी व फोटो वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्यामुळे त्या निराधार-दिव्यांग कुंटूंबाला घर मिळून त्यांचे पुनवर्सन होऊ शकले. महात्मा फुले यांच्या एका पुस्तकात पत्रकाराला कलम कसाई म्हटले आहे, ही बाब सत्य असल्याची प्रचीती विविध प्रसंगातून दिसून येते. असे न घडता, समाजहितकारी जनतेच्या कल्याणासाठीची पत्रकारिता करावी. विषयाच्या संदर्भानुसार मुळ आशय धरुनच बातमीचे लिखान करावे, अशी अपेक्षा राज्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुढे बोलतांना राज्यमंत्री म्हणाले की, पत्रकारांना अगदी तुटपूंज्या मानधनात पत्रकारितेचे काम करावे लागते, हे सत्य असून पत्रकारांच्या समस्या व अडचणी मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे सादर करुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पत्रकारांसाठी शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्यात येईल. तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारांसाठी उत्कृष्ठ संकल्पनेचे पत्रकार भवन निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी संमेलनात सांगितले.
पोलीस अधिक्षक हरीबालाजी एन. म्हणाले की, प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतात. लोकशाहीमध्ये शासनाकडून पारदर्शक काम व्हावे, यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका फार महत्वाची आहे. समाजाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांना पत्रकारांच्या लेखणीतून वाचा फोडली जाते. त्यांच्या बातमीमुळेच प्रशासनाकडून दखल घेऊन वेळीच कार्यवाही केली जाते. अनुचित प्रकारांना प्रतिबंध लावला जातो. प्रसारमाध्यम हे शासनाचे कान, नाक, डोळे म्हणून काम करीत असतात. त्यामुळे पत्रकारांनी नगारिकांचे तसेच समाजाचे भान ठेवून पत्रकारिता करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. आहूजा म्हणाले की, पत्रकारितेचा आता काळ बदलला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून ब्रेकींग न्यूजचे पेव आले आहे. मोबाईलच्या माध्यमातून सर्वप्रथम बातमी वाचकांना मिळू लागली आहे. परंतू आजही वृत्तपत्रातूनच वाचकांना विस्तृत्‍ बातमी वाचयला आवडते. त्यामुळे मुद्रीत माध्यम असलेल्या वृत्तपत्रांचे महत्व टिकून आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता करण्यासाठी अधिकृत ओळखपत्र शासनाकडून जारी झाले तर आणखी चांगल्याप्रकारे बातमीचे विस्तृतीकरण नागरिकांना वाचायला मिळेल. पत्रकारांना देण्यात येणाऱ्या अधिस्विकृती पत्रिका वृत्तपत्रांचा कोटा वाढविण्याची मागणी त्यांनी राज्यमंत्र्यांसमोर मांडली. ज्यामुळे ग्रामीण वार्ताहाराला सुध्दा पत्रिकेचे वितरण होऊ शकेल.
यावेळी राज्यमंत्र्यांनी परमपुज्य जैन मुनी यांचे दर्शन घेऊन आर्शिवाद घेतले.
मुक्तागिरीचे संस्थाध्यक्ष अतुल कळमकर यांनी मुक्तागिरी तिर्थक्षेत्रासंबंधी उपस्थितांना माहिती दिली. परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष श्री. कुलथे यांनी परिषदेच्या कामकाजाविषयी व भूमिकेसंदर्भात प्रास्ताविकातून माहिती दिली.
संमेलनात राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व नानक आहुजा यांना जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते  देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक हरीबालाजी एन यांचाही शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह व मुक्तागिरीचा तिर्थक्षेत्राची फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकमतचे प्रतिनिधी अनिल कडू, उद्योजक सुनील अग्रवाल, महाराष्ट्र टाईम्सचे श्रीपाद अपराजीत, अध्ययन समाचारचे संपादक जितेंद्र रोडे, वार्ताहार इर्शाद अहमद, अश्विन शहा, विनायक येवले यांच्यासह अन्य पत्रकारांचे मान्यवरांच्या हस्ते नवदर्पण पुरस्कार देऊन सत्कार आला. संमेलनाला नांदेड, पुणे, नागपूर, खामगाव, चिखलदरा, धारणी, अचलपमर तालुक्यातील पत्रकारमंडळी उपस्थित होती.
ज्येष्ठ पत्रकार संजय जोशी यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती