Monday, March 16, 2020

सॅनिटायझर व मास्कचा काळा बाजार करणा-यांवर कठोर कारवाई - पालकमंत्री यशोमती ठाकूर

जिल्ह्यातील यंत्रणेचा पालकमंत्र्यांकडून आढावा
                            स्वच्छता व दक्षतेबाबत व्यापक जनजागृती करावी
           





अमरावती, दि. 16 :  कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून समन्वयाने कार्यवाही करावी. जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागांत परिसर स्वच्छतेवर भर द्यावा, तसेच सॅनिटायझर व औषधे यांच्या काळा बाजार होऊ नये यासाठी काटेकोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजनांच्या अनुषंगाने विविध यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक लांडे, डॉ. अनिल रोहणकर यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाचे, तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी प्रारंभी जिल्हाधिका-यांकडून जिल्ह्यातील विविध उपाययोजनांविषयी माहिती घेतली. जिल्ह्यातील टूर ऑपरेटर्सची बैठक घेऊन बाहेरून आलेल्या पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले होते.  त्यानुसार बाहेरून येणा-या पर्यटकांची तपासणी व देखरेखीसाठी वैद्यकीय पथके निर्माण करण्यात आली आहेत. अशा व्यक्तींना स्वत:हून घरीच 15 दिवस स्वतंत्र राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  संशयित आढळल्यास त्यांना ठेवण्यासाठी विलगीकरण कक्षही तयार करण्यात आले आहेत. नाट्यगृह, चित्रपटगृह, जलतरण तलाव, जिम बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. डी मार्ट आदी स्टोअर्स ही जीवनावश्यक वस्तू विक्री केंद्र असल्याने त्यांना अद्याप बंदी घातलेली नाही. विविध यंत्रणांकडून जनजागृतीही केली जात आहे, असे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.
            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाने जारी केलेल्या सर्व आदेश व सूचनांचे पालन व्हावे. शासकीय कार्यालयातही सॅनिटायझर उपलब्ध असावे. त्याचा वापर व्हावा.  कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये. बाहेरून परतलेल्या व्यक्तींची दक्षतापूर्वक तपासणी व्हावी. अशा व्यक्तींनी व त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून माहिती द्यावी. वैद्यकीय पथकांनी वेळोवेळी त्यांच्या संपर्कात राहावे. योग्य ती दक्षता घेतल्याने संसर्ग टाळता येतो. त्याबाबत व्यापक जनजागृती करावी. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून जनजागृती कार्यात डॉक्टर मंडळींनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
                 काळा बाजार करणा-यांवर कारवाई
सॅनिटायझर आणि मास्कचा काळा बाजार करण्याचा प्रकार कुठे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना घाबरविण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. मास्कची किंमत वाढवणे, जादा फी घेणे असे कुठलेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.  रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असावा व वैद्यकीय यंत्रणेने सजग राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यात शहरे व ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी फॉगिंग आदी उपायांची तत्काळ अंमलबजावणी करावी. नाल्यांची स्वच्छता करावी. डास निर्मूलनावर भर द्यावा जेणेकरून अन्य संसर्गजन्य आजार वाढणार नाहीत. सद्य:स्थिती लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी मिशनमोडवर काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  
नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घेणे आवश्यक आहे. कुठलीही माहिती लपवून ठेवू नये. शासनाकडून उपाययोजनांसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत आहेत. नागरिकांनीही दक्षता बाळगून सहकार्य करावे. सर्वांनी मिळून कोरोना विषाणू संसर्गाचा यशस्वीपणे मुकाबला करूया, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
            तीव्र ताप येणे व श्वसनक्रियेत अडथळे येत असल्याचे आढळल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. मात्र, ताप हा वेगवेगळ्या कारणांमुळे आलेला असतो. त्यामुळे डॉक्टरांनीही याबाबत परिपूर्ण माहिती द्यावी. गर्दी टाळण्याबाबत आवाहन करावे. सर्व सार्वजनिक समारंभ, कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विवाह समारंभ नियोजित असल्यास मोठा समारंभ टाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह साजरा करावा व समारंभ काही कालावधीनंतर साजरा करावा. गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.
            वैद्यकीय अधिका-यांची प्रशिक्षणे घेतली जात आहेत. तथापि, गर्दी टाळण्यासाठी एकत्र प्रशिक्षण न घेता तालुका स्तरावर घ्यावे, असे निर्देशही जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
            इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे जनजागृती मोहिमेत योगदान देण्यात येत आहे, असे डॉ. लांडे व डॉ. रोहणकर यांनी यावेळी सांगितले.
                                                000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...