Sunday, March 29, 2020

कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा सुरू असल्याने दक्षतेचे आवाहन


जिथे आहात तिथेच थांबा, तुमची जबाबदारी शासनाची
स्थलांतर रोखण्यासाठी पालकमंत्र्यांचे आवाहन

अमरावती, दि. 29:  कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा सुरू असून, या काळात नागरिकांनी बाहेर न पडण्याची खबरदारी घ्यावी. इतर राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेले लोक, कामगार यांनी स्थलांतर करू नये. आहेत तिथेच थांबावे. शासनाने त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांच्यासाठी केंद्रे सुरु करण्यात आली असून, तिथे त्यांची राहण्याची आणि भोजनाची सोय केली आहे. त्यामुळे स्थलांतर करू नये, असे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
            कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून अनेक पावले उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यात संचारबंदी लागू असून, या काळात नागरिकांनी बाहेर न पडण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे.  त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये. प्रवासी नागरिकांनी स्थलांतर करू नये. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था निवारा केंद्राद्वारे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी निवारा केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तिथे व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाच्या मदतीला स्वयंसेवी संस्थांही पुढे येत आहेत. प्रवासी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच इतर आवश्यक सुविधाही या ठिकाणी आहेत. अशा काळात कुणीही प्रवास करू नये. जिथे आहात, तिथेच थांबावे. कोणीही कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये. मदतीची आवश्यकता असल्यास किंवा कुठलीही अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी केले आहे.

आपत्ती निवारणाच्या या काळात नागरिकांनी सजग व दक्ष राहणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी अधिकृत माहिती जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे कुठल्याही खोट्या माहितीवर किंवा अफवेवर विश्वास ठेवू नये.  विनाकारण घाबरून जाऊ नये. मात्र, आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करावे. घराबाहेर पडू नये. आपल्यासह इतरांनाही सुरक्षित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

                                                000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...