कोरोनाच्या प्रतिबंधासाठी बंदीजनांकडून मास्कची निर्मिती


पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार अमरावती कारागृहात मिशनमोडवर मास्कनिर्मिती
  

अमरावती, दि. 20 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी अधिकाधिक मास्क उपलब्ध व्हावेत या हेतूने येथील जिल्हा कारागृहात बंदीजनांकडून मिशनमोडवर मास्कची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी याबाबत निर्देश दिले असून, त्यानुसार नागरिकांची गरज लक्षात घेऊन बंदीजनांकडूनही हे काम युद्धपातळीवर केले जात आहे.

विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्क महत्वाचा मानला जातो. त्यामुळे सद्य:स्थितीत   नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा कारागृहातील कुशल कारागीर बंदीजनांकडून कापडी मास्क तयार करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे यांना निर्देश दिले. कारागृह प्रशासनानेही तत्काळ पावले उचलत बंदीजनांना सद्य:स्थिती लक्षात  आणून देऊन आवाहन केले. त्यानुसार सर्वांनी कामाला गतीने सुरुवात केली आहे.
   
मास्क वारंवार वापरता येणार
हा मास्क कापडापासून तयार होणार आहे. त्यामुळे त्याचा पुनर्वापर करता येणार आहे. अमरावती कारागृहातील बंदीजनांकडून विविध उपयुक्त वस्तू तयार करण्यात येतात. त्याच धर्तीवर बंदीजनांकडून कापडाचे मास्क तयार करण्याचे काम सुरू आहे. हे मास्क एकापेक्षा अधिक वेळ वापरता येतील. एकदा मास्क वापरल्यानंतर दुस-यांदा त्यावर सॅनिटायझर अथवा डेटॉलने धुवून निर्जंतुकीकरण केल्यानंतर पुन्हा हे मास्क वापरता येणार आहेत.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेले अनेक बंदीजन कुशल कारागीर आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मातीच्या मूर्त्या, राखी, फर्निचर, कागदी पिशव्या तयार केल्या जातात.  त्यांची बाजारात विक्री केली जाते व त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. कारागृहातील शेतीतही विविध प्रकारची उत्पादने घेतली जातात. आता कोरोना विषाणू संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांना उपयोगी पडणारा मास्क तयार करण्याच्या कामात अमरावती कारागृहातील बंदीजन गुंतले आहेत.
                                                000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती