Saturday, March 21, 2020

मास्कनिर्मितीच्या कामात आता महिला बचत गटांचेही सहकार्य - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


 

अमरावती, दि. 20 :  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या निर्देशानुसार जिल्हा कारागृहात बंदीजनांकडून मिशनमोडवर मास्कची निर्मिती सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील महिला बचत गटांचाही मास्कनिर्मितीच्या कामात सहभाग मिळवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.

नागरिकांची गरज लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर मास्कनिर्मितीसाठी कारागृहातील  बंदीजनांकडूनही हे काम करून घेण्याबाबत निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार हे काम गतीने सुरु झाले असून, आता महिला बचत गटांनाही या कामात सहभागी करून घेण्यात येत आहे जेणेकरून अधिकाधिक मास्क निर्माण होतील.

जिल्हा प्रशासन, ग्रामोद्योग कार्यालयातर्फे जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासाठी महिला बचत गटांना सोलर चरखे आदी साधनांचे वाटप वेळोवेळी केले जाते. कस्तुरबा खादी समितीच्या अंतर्गत 300 हून अधिक महिला खादी कापडनिर्मिती व विविध कपड्यांची निर्मिती करतात. त्याचे एक युनिटही एमआयडीसी क्षेत्रात कार्यान्वित करण्यात आले आहे. तेथील कपड्यांना मुंबईसह विविध शहरांतून मागणी असते. जिल्ह्यातील या महिला बचत गटांचे सहकार्य मास्कनिर्मितीच्या कामात  मिळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. त्यामुळे या महिला भगिनींना रोजगारही मिळणार आहे.

 

विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्क महत्वाचा मानला जातो. त्यामुळे सुरक्षित कापडी मास्क तयार करण्याचे काम बचत गट करणार आहेत. हा मास्क कापडापासून तयार होणार आहे. त्यामुळे त्याचा पुनर्वापर करता येणार आहे. एकदा मास्क वापरल्यानंतर दुस-यांदा त्यावर सॅनिटायझर अथवा डेटॉलने धुवून निर्जंतुकीकरण केल्यानंतर पुन्हा हे मास्क वापरता येणार आहेत. खादी समितीकडून विविध महिला बचत गटांचे जाळे विणण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मास्कनिर्मिती शक्य होईल, असे ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी सांगितले.

                            000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...