कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहनघराबाहेर पडू नका, काळजी घ्या - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे कळकळीचे आवाहन


अमरावती, दि. 28 : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गंभीर आहे. त्यामुळे गर्दी व घराबाहेर पडणे टाळण्याची दक्षता घेतलीच गेली पाहिजे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जिल्हा प्रशासन, आरोग्य व पोलीस यंत्रणेकडून विविध उपायांची अंमलबजावणी होत आहे. त्यांच्या सूचनांचे पालन करा. पुढील 7 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या काळात कुणीही अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नका. सर्वांनी मिळून दक्षता पाळून कोरोना संकटाचा सामना करू, असे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून शासनाने संचारबंदीसह विविध पावले उचलली आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा व गर्दीही टाळली जावी, या हेतूने घरपोच सेवेचीही तरतूद करण्यात आली आहे.  या काळात नागरिकांनीही आवश्यक सूचनांचे पालन करावे. गर्दी टाळणे व घरी राहणे हाच दक्षतेचा उपाय आहे. या आजाराची लागण एका व्यक्तीला झाल्यास त्याच्या संपर्कातील कुटुंबिय, परिचित सर्वांना होऊ शकते. त्यामुळे आपले कुटुंब, परिसर, शहर सुरक्षित ठेवणे हीही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे वेळेचे गांभीर्य ओळखा. कृपया कुणीही अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नका. कुठलीही अडचण आल्यास प्रशासनाने विविध हेल्पलाईन नंबर प्रसारित केले आहेत. त्यावर संपर्क करा. आपल्या निवासस्थानीही हेल्पलाईन सुविधा 07212665573 या क्रमांकावर उपलब्ध आहे. याच क्रमांकावर व्हाटस ॲप सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी   तीनजणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. नागरिकांनाही कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधावा. मात्र, घराबाहेर पडू नये व आपली, आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी. आपणही दक्षता घ्या, इतरांनाही सुरक्षित करा, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

                                            000  

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती