संचारबंदीच्या तरतुदीत बदल



             *जीवनावश्यक वस्तू विक्री दुकानांची वेळ आता सकाळी 8 ते दुपारी 2*

_घरपोच सेवेची वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 6_

_वाणिज्यिक वाहतूक पूर्णवेळ सुरु_

अमरावती, दि. 28 : _कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला विक्री, किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ आदी विक्री करणा-या दुकानांसाठी सकाळी 8 ते दुपारी 2 ही वेळ  निश्चित करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरु ठेवता येईल. तथापि, अशा जीवनावश्यक वस्तूंची उत्पादक ते घाऊक विक्रेत्यांपर्यंतची वाणिज्यिक वाहतूक पूर्णवेळ सुरू राहील_.  

 कोरोना विषाणूची लागण एका संक्रमित व्यक्तीकडून संपर्कात येणा-या अन्य  व्यक्तीकडे होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याची गरज आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. तथापि, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी खरेदी विक्रीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला.

त्यानुसार जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेत समाविष्ट किराणा माल, धान्य दुकाने, दुध, दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे. पशुखाद्य केंद्र, कृषी सेवा केंद्र यासंबंधीची *दुकाने* दररोज सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहतील.

                                  *अत्यावश्यक वस्तू निर्मात्यांना वाहतुकीची परवानगी*

जीवनावश्यक वस्तूंची दुकानांपर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतुकीची पूर्णवेळ परवानगी देण्यात आली आहे. धान्य दुकाने, औषधी, दूध व दुधाचे पदार्थ, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडे, मांस. मासे, पशुखाद्य, कृषी संबंधी वस्तू आणि त्यांच्या वाहतुकीसाठी स्वत:हून त्या मालवाहू गाडीच्या विंडो स्क्रीनवर स्पष्टपणे जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवा असल्याचे नमूद करावे. कच्चा माल, गोदाम उपक्रम म्हणून प्रक्रियेसाठी आवश्यक वस्तू वाहून नेणा-या वाहनांना पासेसची व्यवस्था प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी करावी.  

जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन ते घाऊक विक्रेत्यांपर्यंत वाहतूक, *अत्यावश्यक सेवांची, पदार्थांची वाहतूक* पूर्णवेळ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या *घरपोच सेवेसाठी सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत वेळ* निश्चित करून देण्यात आली आहे. त्यासाठी डिलिव्हरी बॉईज यांना स्थानिक स्वराज्य संस्थेने पास उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

                                               *वाहतूक सेवेसंबंधी निर्देश*

जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन व अत्यावश्यक वस्तूसंबंधी उद्योगात कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचारी यांना प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक यांनी पास निर्गमित करावी.

शहरातील घाऊक, किरकोळ धान्य, भाजीपाला, फळे, औषधे, वैद्यकीय उपकरणे, ऑप्टिकल आदी व्यवसाय करणा-यांना, तसेच घरपोच सेवा देणा-यांना महापालिकेच्या बाजार परवाना विभागाने पासेस निर्गमित कराव्यात. इतर ठिकाणी नगरपरिषद, पंचायत यांनी पास द्याव्यात.

डेअरी, पोल्ट्री व शेतीपूरक उद्योगाबाबत पशुसंवर्धन उपायुक्तांनी पास निर्गमित कराव्यात. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना संबंधित विभागाच्या अधिका-यांनी पासेस द्याव्यात, असे आदेशात नमूद आहे. अशा पासेस निर्गमित करताना संबंधित विभागाने त्या सेवेच्या उद्योजकांना स्वच्छतेबाबत, तसेच कर्मचारी, मजूर, व्यापारी वर्ग यांना मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हस्, काम करताना ठराविक अंतर व आवश्यक ती दक्षता घेण्याबाबत व जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. अनावश्यक पासेस निर्गमित केल्यास संबंधित अधिका-याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

महावितरणने वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याचेही निर्देश आहेत. या पासेसचा दुरुपयोग होत असल्याचे आढळल्यास पोलीसांनी तात्काळ चौकशी करून वरिष्ठांच्या निदर्शनास आणावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. 

                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती