Friday, March 20, 2020

सीमा भागात वाहनांच्या तपासणीचे आदेश


अमरावती, दि. 20 : कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याशी संलग्न आंतरराज्यीय सीमेवर पोलीस व परिवहन विभागामार्फत चेकपोस्ट, तपासणी पथके तयार करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी निर्गमित केले आहेत.
इतर राज्यांतून येणा-या वाहनांची तपासणी करावी. वाहनामध्ये येणारे प्रवासी व चालक यांची सर्वसाधारण तपासणी करावी. ताप, खोकला, सर्दी व इतर लक्षणे आढळल्यास तत्काळ तालुका वैद्यकीय अधिका-यांना व नियंत्रण कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
                                    ग्रामीण व शहरी भागात स्वच्छतेचे आदेश
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात स्वच्छतेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका आयुक्तांना दिले आहेत. गटार व नालेसफाई करण्यासह कचरा व सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. डास प्रतिबंधक फवारण्या कराव्यात, आदी निर्देश देण्यात आले आहेत.
औद्योगिक क्षेत्रात कर्मचारी वगळता इतरांना प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे. औद्योगिक आस्थापनांनी आवश्यक तेवढाच स्टाफ बोलवावा. कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
                        आरटीओ कार्यालयात चाचण्या तूर्तास स्थगित
शिकाऊ परवान्याबाबत सर्व कामकाज दि. 31 मार्चपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे. तालुकास्तरीय कॅम्पही या कालावधीत होणार नाहीत. वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा नोंदणी घेणे किंवा कमी करणे आदी कामे होणार नाहीत. कार्यालयात जास्त गर्दी होऊ नये यासाठी हे काही कामकाज स्थगित ठेवले असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.
                                                000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...